नळदुर्ग, दि. 01 : येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय (कोविड सेंटर) शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर रोजी चालु होण्याची तुर्त शक्यता मावळली आहे. दोन आठवड्यापूर्वी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हे रुग्णालय सुरु करण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केल्याची माहिती दिली. दरम्यान, बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तुळजापुरचे तहसिलदार सौदागर तांदळे यांनी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. मात्र यावेळी काय निर्णय झाला, याबाबत माहिती‍ मिळू न शकल्याने रुग्णालय प्रकरण हे गुलदस्त्यात आहे.  याबाबत नागरिकात चर्चा रंगली आहे.

गुरुवार दि. 1 ऑक्टोबर रोजी नियोजित उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे भेट देवून पाहणी केली असता लाईट फिटींग, कलर, प्लबिंग, दरवाजे, खिडक्या, वॉल टाईल्स आदी कामे अर्पूण असून सहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत रुग्णालयाचा फक्त सांगडा उभा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय सुरु होण्याची अपेक्षा तुर्तास मावळली आहे. सन 2014 मध्ये सुमारे 21 कोटी रुपये खर्चाच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयास राज्य शासनाने मान्यता दिली. 50 बेड, 50 डॉक्टर, वैद्यक तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, सेविका यांच्या निवासाची सोय होण्याची तरतुद केली आहे. 

वास्तविक पाहता, 18 महिन्यांमध्ये रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम कराराप्रमाणे पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र यावर ठेकेदाराने आतापर्यंत 13 कोटी रुपये खर्च केल्याचे समजते. एवढे खर्च करुनही रुग्णालयाची अद्यवत वास्तू पूर्ण नाही. त्याचबरोबर अंतर्गत रस्ते, गटारी, पथदिवे आदी सुविधांची कामे अद्याप झाले नाही. सदर 21 कोटीचा ठेका 35 कोटीपर्यंत पोहचलेला असून 50 कोटी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुस्त प्रशासन, राजकीय मतभेद, वेळखाऊ ठेकेदार यामुळे नळदुर्ग व परिसरातील 65 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आज तरी सुटलेला नाही. 

उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय दि. 2 ऑक्टोबर रोजी चालू होणार याबाबत नागरिकात उत्सुकता लागली असून नागरिकात याप्रकरणी चर्चा होत आहे.


 
Top