तुळजापुर : कुमार नाईकवाडी
सोयाबीनसह इतर पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे, अशा मागणीचे एक लेखी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी तुळजापुरचे तहसिलदार सौदागर तांदळे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापुर तालुक्यामध्ये सोयाबीन पिकांचे तलाठी व कृषी सहाय्यक हे शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर जाऊन पंचनामे करीत आहेत. तालुक्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, उडीद, मुग,कांदा, मका ऊस आदीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सदरील पिके बाधीत झाले आहेत. तरी संबंधित तुळजापुर तालुक्यातील तलाटी व कृषी सहाय्यकाना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे, असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर रा.काँ. चे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, गोकुळ शिंदे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, शहर अध्यक्ष अमर चोपदार, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळुके, युवक शहराध्यक्ष शरद जगदाळे, बबन गावडे, धनंजय पाटील, सर्मथ पैहलवान, महेश कोळेकर आदीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत.
