आजच्या आधुनिक युगात स्त्रिया व वृद्ध लोकांबद्दल वाढते अत्याचार, स्वार्थ प्रवृत्ति, प्रदूषित वातावरण, शोर, नशा, फसवणूक, निकृष्ठ गोष्टी, अपमानास्पद शब्द किंवा वर्तन, इतरांकडून अती अपेक्षा, वाढती जबाबदारी, संस्कारांची कमतरता, एकटेपणा, दुखी आठवणी, सहानुभूतीचा अभाव, निराशा, अपयश, परिस्थितीला घाबरून जाणे किंवा लवकर हतबळ होणे, रात्री उशिरा पर्यंत जागणे, पौष्टिक व संतुलित आहाराची कमतरता, कुटुंबात समजूतदार मार्गदर्शकांचा अभाव, भवितव्याची काळजी अशा गोष्टी माणसाला मानसिक आजार देतात. सध्या माणूस क्षणार्धात आनंदासाठी भटकत आहे, तो अत्यंत चिडचिडा, उग्र होत आहे, सहनशक्तीच्या अभावामुळे मनुष्य पटकन संयम गमावतो, भारतीय मनोविकृती संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की लॉकडाऊन नंतर मानसिक रोगांच्या बाबतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे, ज्यामध्ये दर पाच भारतीयांपैकी एक जण त्रस्त आहे.

आपला सर्वात मोठा शत्रू आपण स्वत :- आपल्या मनात जगभरातील विचार फिरत असतात, लहान समस्यादेखील गंभीर स्वरुपात बघतो. खूप टेन्शन घेतो की समस्या कशी सुटेल? काय करायचं? लोक मनाच्या मनामध्ये हजारो गोंधळ निर्माण करून स्वतःलाच गुंतून घेतात आणि अडकतात त्यामुळेच व्यक्ती आतून संकुचित होत जातो, मग नकारात्मक विचार मानवी मनामध्ये रुजतात, असे लोक कुटुंबापासून दूर जाऊ लागतात, अशाप्रकारे, हळूहळू ते सर्वसाधारणपणे मानसिक विकृतीकडे वाढत असतात आणि अनुचित घटनांना बळी पडतात. आज समाजात बर्याच समस्या आहेत आणि त्यात आपलाही छोटासा सहभाग आहे. आम्हाला बर्याच अडचणींची कारणे आधीच माहित असतात, तरीही आपण जे करू नये तेच मुद्दाम करतो. मादक पदार्थ हानिकारक आहेत हे जाणून देखील, लोक स्वतःहून व्यसनाचा आहारी जातात. फक्त जिभेच्या चवीसाठी, बाहेरचे नको ते उलट-सुलट खातात. आणि शरीर खराब करतात. शरीरासाठी फायदेशीर असलेल्या गोष्टींपासून आपण नेहमीच दूर पडतो. अर्थात जास्ततर शारीरिक, मानसिक रोगांचे मूळ आपणच तयार करतो.

मानवी सुरक्षा सुविधेसाठी नियम कायदे आहेत, परंतु लोक स्वतः नियम मोडतात. आपल्या जवळचा लोकांना विसरून सोशल मीडियाची सवय लावून तिथे मित्र शोधतात, अमुल्य वेळ घालवितात, तणावग्रस्त वातावरणात जगतात, व्यायाम करायला कंटाळा करतात. कंटाळवाणे, नकारात्मक आणि रडणारे- टीव्ही मालिका, कार्यक्रम पासून दूर रहावे कारण आपण ज्या प्रकारे पाहता, ऐकता, विचार करता, त्याचा परिणाम आपल्या मनावर पडतो आणि तेच आपल्या व्यवहारात उतरत असते। नेहमी निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करावे. खरेदी किंवा व्यवहार करताना जागरूक रहा, आकर्षण आणि आवश्यकतेमधील फरक समजून घ्या. आपले कुटुंब, समाज, देश यांच्याबद्दलची आपली जबाबदारी समजून घ्या. मुलांना चांगले संस्कार देत नाहीत आणि जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा पालक पश्चात्ताप करतात व इतरांना दोष देतात, आपली मुले मोठी होऊन देश आणि मानवजातीच्या विकासाचा आधार बनावे, उलट गुन्हे करून माणूसकीला काळीमा फासणारी कृत्य करणारी व्हायला नको, ही जबाबदारी पालकांची आहे. एक चुकीचा निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकतो. नेहमी निर्णय घेण्यापूर्वी, संबंधित सर्व बाबींकडे लक्ष द्या, लोक काय करीत आहेत, त्याऐवजी, आपण काय करीत आहोत याचा विचार करा, कुजबुज करणारे आणि स्वार्थवृत्तिच्या लोकांपासून दूर रहा, लोकांना ओळखण्यास शिका. देखाव्याचा जीवनशैलीपासून दूर रहा, तुमची विचारशक्ती वाढवा, काळाची मागणी समजून घ्या आणि त्यानुसार स्वतःला बदला.

चांगले आरोग्य मिळवण्यास स्वतःकरीता वेळ काढा :- चांगले आरोग्य हा जीवनातील यशाचा आधार असतो, स्वतः समाधानी, संतुष्ट रहा, सकारात्मकतेला प्रोत्साहन देणारे मित्र, नातेवाईक आणि शेजार्यांशी नेहमीच स्वस्थ संबंध ठेवा. सकारात्मक आणि आशावादी दृष्टी आपल्याला मानसिकदृष्ट्या निरोगी करते. चांगले आणि आनंदी वाटणे, इतरांचा द्वेष किंवा हेवा न वाटणे हे मानसिक आरोग्य स्वस्थ असण्याचे सूचक आहे, तरीही जेव्हा आपण इतरांवर रागावतो तेव्हा त्याचा वाईट परिणाम आपल्याच शरीरावर, मनावर होतो. स्वतः हसणे, आपल्या आजूबाजूचा लोकांना हसवणे आणि वातावरण आनंदी ठेवणे, इतरांचा सन्मान करणे आणि सगळ्यांशी अत्यंत सभ्यपणे वागणे हे सर्व आपल्याला निरोगी बनविते. त्याचप्रमाणे, नैसर्गिक वातावरण हा आपल्या आरोग्याचा एक प्रमुख पाया आहे.

प्रत्येकजण आपल्या जीवनात निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी या 5 गुणी नियमांचे अनुसरण करा.

व्यायाम :- आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम हा नित्यचा भाग असावा. शारीरिक आरोग्य देखील आपल्याला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्यायाम, मग तो योग असो, जिम, खेळ, पायी चालणे, पाळीव प्राण्यांसोबत खेळणे, सायकल चालवणे किंवा कोणताही शारीरिक श्रम करणारा व्यायाम असो तो करायलाच पाहीजे. ध्यान केल्याने सुद्धा आरोग्याची पातळी सुधारते, यामुळे आपले मन शांत होते. आपण जितकी कॅलरी घेतोय, तितकी खर्च करायला हवी, म्हणजे शरीरात अन्नाचे योग्य पाचनकार्य आवश्यक आहे.

पौष्टिक आहार :- शरीराला आणि मनाला योग्य क्षमतेने कार्य करण्यासाठी आणि ऊर्जेसाठी आपल्याला एक चांगला पौष्टिक आहार हवा असतो कारण हा आहार आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत बनवतो. मानवी आहारात समाविष्ट पाच मुख्य पोषक घटक - कार्ब, प्रथिने, वसा, खनिज लवण आणि जीवनसत्त्वे वेगवेगळ्या पातळीवर, शारीरिक ताकत सोबत मानवी भावना, मनःस्थिती नियंत्रित आणि मानसिक समतोल राखण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका निभावतात. याव्यतिरिक्त, उदासीनता, ताणतणाव, चिंता, अल्झायमर यासारख्या प्रमुख मानसिक आजारांवर आहार, योग्य पौष्टिक पूरक आहार (न्यूट्रिशन सप्लीमेंट) सारख्या पद्धतीने उपचार करण्यास मदत होते.

संपूर्ण झोप :- प्रत्येक व्यक्तीला किमान आठ तास झोप मिळणे फार महत्वाचे आहे. अशी निश्चींत झोप दररोज आपल्या शरीराला आणि मेंदुला चार्ज करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की योग्य वेळी झोपेची योग्य मात्रा न मिळाल्यास शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण असमतोल होतात. ते पाचन विकार, डोकेदुखी, औदासिन्य, चिंता आणि चिडचिडेपणाचे कारण बनतात. झोप न लागल्याने मानसिक आणि शारीरिक ताणतणाव वाढतो. शरीराची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया बदलू लागते. याचा परिणाम तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळीवर होतो, ज्याचा परिणाम शरीराच्या रक्त वाहिन्यांवर परिणाम होतो. आपल्या झोपेची वेळ ठरवा, दररोज त्याच वेळी झोपायला जा, आणि ही सवय बनवा. इलेक्ट्रॉनिक संसाधनाचा वापर कमी किंवा आवश्यक असल्यास तरच करावा. निसर्गाशी जवळीक करावी. आज मोबाइल इंटरनेट, सोशल मिडियाच्या व्यसनाने लाखो लोकांच्या झोपेचा त्रास झाला आहे.

देखावांपासून दूर रहा :- आपल्या समाजात, देखावा ही अशी फॅशन बनली आहे. स्वताला सर्वश्रेष्ठ बनवण्याचा नादात दररोज अनेकांचे जीवन उध्वस्त होत आहेत. जग आपल्याबद्दल काय म्हणेल, ही भावना मनात बाळगून ते देखावा करतात, मनाला मारून जे आवडत नाही ते काम करतात. खोटे बोलतात, नकारात्मक विचार करतात. लोक आतून एक आणि बाहेरून दूसरे असतात, अशे लोक वेळेनुसार बदल सहन करत नाहीत, भीतीच्या दळपणात वावरतात, चिंतेने चुकीचे निर्णय घेतात किंवा आपले जीवन नष्ट करतात. त्यांचा जवळ दर्शविण्यासाठी हजारो आहेत, परंतु संकटकाळी कोणीही नसते. मनुष्याने नेहमीच साधे जीवन जगले पाहिजे, म्हणजेच आपण वेळ व आवश्यकतेनुसार कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी लोक जवळीक करण्याचा प्रयत्न करतात पण चांगले लोक तुमच्या कार्यावर, वागणूकीवर, स्वभावावर प्रभावित होतात आणि तुमचे आपले बनतात. तेव्हा जगाला तुम्ही जसे आहात तसेच दर्शवावे.

सामाजिक कार्य :- मनुष्य म्हणून जन्मला, तर माणूस म्हणून जगा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला परोपकाराची भावना असावी. जीवन असे जगावे की आपल्यामुळे इतरांना कधीही त्रास होवू नये. दररोज एक तरी काम आपण समाज, असहाय लोक, पर्यावरण, प्राणी आणि पक्ष्यांसाठी निस्वार्थपणे केलेच पाहिजे अर्थातच आपण इतरांकरीता ही जगणे शिकले पाहिजे, जेणेकरुन आपल्याला माणूसकी म्हणून दुसऱ्यांचा कामी येण्याचे समाधान मिळेल. अशा कामाने मनाला अमर्याद शांती संतुष्टी प्राप्त होते, जी तुम्हाला पैसे खर्च करूनही मिळू शकत नाही. तणावमुक्त जीवन जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

जर आपण या 5 नियमांचे सतत पालन केले तर आपण नेहमी आनंदी, निरोगी, सकारात्मक उर्जेने भरलेले असाल. आपण इतर लोकांपेक्षा अधिक सक्षम व्हाल, आपली रोगप्रतिकार शक्ती व आत्मविश्वास वाढेल आणि आपण शारीरिक आणि मानसिक आजारांपासून दूर रहाल. कठीण काळात कधीही हार मानू नका, प्रयत्न करणे हे काम आहे. जर समस्या असेल तर वेळ देखील सतत बदलत असते, त्याच प्रकारे परिस्थिती कधीही एकसारखी नसते. माणसाच्या आत असलेली भीतीच माणसाला कमकुवत बनवते. माणसाला फक्त वाईट कृत्ये करण्यास घाबरायला पाहिजे. लोक काय म्हणतील ते विसरून जा कारण हे लोक आपल्या समस्या सोडवायला किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी येत नाहीत, म्हणून चांगली कामे लहान किंवा मोठी असो, आयुष्यात कधीच करायला लाज वाटू नये. हे लेख वाचून एकदा स्वताचे व्यवहार, दिनचर्या बद्दल आत्मनिरीक्षण करून नक्कीच बघा. भावनिकदृष्ट्या मजबूत बना. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा, नेहमी हसत-खेळत, सकारात्मक आणि तणावमुक्त रहा.

- डॉ. प्रितम भि. गेडाम

भ्रमणध्वनी क्रं 082374 17041

prit00786@gmail.com




 
Top