तुळजापूर : कुमार नाईकवाडी
नगरपरिषद कार्यालय तुळजापूर येथे सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सर्व नगरसेवकांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात बैठक संपन्न झाली.
या बैठकीत तुळजापूर येथे दि. 9 ऑक्टोबर शुक्रवार रोजी होणाऱ्या सकल मराठा क्रांती मोर्चासाठी राज्य शासनाचे सर्व नियम, अटीला अधीन राहून व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून सहभागी होण्याबाबत एक मताने निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सदरील मराठा क्रांती मोर्चामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले हे स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. आ. पाटील यांनी स्वतः खासदार संभाजीराजे भोसले यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली आहे.
सदरील मोर्चा शिस्तप्रिय नियोजनबद्ध शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे. या बैठकीस तुळजापुर नगरपरिषदचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
