जळकोट : मेघराज किलजे 

नळदुर्ग येथील उपजिल्हारूग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम गेल्या सहा वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या अवस्थेत असून अद्यापही हे काम पुर्ण झाले नाही. सदर इमारतीच्या काही भागाचे काम पूर्ण झाले आहे. याच ठिकाणी लवकरात लवकर रूग्णालयाचे कामकाज सूरू करून नळदुर्ग शहर व परिसरातील जवळपास ५०ते ६० गावातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्यापही रुग्णालय सुरु करण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत.  त्यामुळे उपजिल्हा रूग्णालय तात्काळ सुरू न करणा-या प्रशासनाचा जाहिर निषेध नोंदवित आज दि. ३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रुग्णालयाचे प्रतिकात्मक उदघाटन केले.

काही दिवसांपूर्वी तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्यानेही या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलताना, राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी आपले बोलणे झाले असून ,लवकरच हे रूग्णालय सुरू होईल असे आश्वासन दिले होते. प्रशासनाकडूनही २ ऑक्टोबर रोजी सदर उपजिल्हारूग्णालय सुरू करण्यात येईल असे जाहिर केले होते. परंतु २ ऑक्टोबर हि तारीख सुद्धा होवून  गेली. अद्यापही या ठिकाणी हे उपजिल्हारूग्णालय सुरू होण्यासाठी कसल्याही प्रकारच्या हालचाली प्रशासनाकडून दिसून येत नाहीत. केवळ जनतेची दिशाभूल करून श्रेय लाटण्यासाठी कांही राजकीय नेत्यांनी खटाटोप केला होता. 

यामुळे नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक चालढकल करीत सदर उपजिल्हा रूग्णालय तात्काळ सुरू न करणा-या प्रशासनाचा जाहिर निषेध नोंदवित आज दि. ३ ऑक्टोबर  रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते उपजिल्हा रूग्णालयाच्या नूतन इमारतीचे  प्रतिकात्मक "उद्घाटन " करण्यात आले. या कार्यक्रमास उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हासचिव ज्योतिबा येडगे, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार,जनहित व विधी विभागाचे तालुकाध्यक्ष अॅड.मतिन बाडेवाले, मनसे शहराध्यक्ष अलिम शेख, शहरसचिव प्रमोद कुलकर्णी,मनविसे शहरसचिव भाऊराज कांबळे, अझर शेख यांच्या सह कार्यकर्ते (कोविड 19 चे नियमांचे पालन करून)  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top