तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
सोलापूर- तुळजापूर या राष्ट्रीय राजमार्गावरील उळे येथील अतिशय जुना असलेला पुल न पाडता जुन्याच पुलाला डागडुजी केली असून हा अरूंद पुल पाडुन त्याठिकाणी नविन पुल बनवावा अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात असे मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महींद्रकर, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मनोज बचुटे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सोलापूर ते धुळे हा चार पदरी राष्ट्रीय राजमार्ग (नं.५२) हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे या गावामधून गेला आहे. हा राजमार्ग बनवत असताना गावाजवळ असलेला जुना दगडी पुल न पाडताच जुन्या पुलाला डागडुजी केली असल्याने हा पुल अरूंद बनला आहे.गावातील नविन उड्डाण पुलावरून पुढे तुळजापूरकडे जाताना लगेच तो धोकादायक अरूंद पुल वेगात असलेल्या वाहनचालकांना दिसत नाही व अपघात होऊन अनेकांना विनाकारण आपले प्राण गमवावे लागले आहेत याला जबाबदार कोण? हा जुना अरूंद पुल पाडुन त्याठिकाणी नवीन पुल का बनवला नाही? याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे वरीष्ठ अधिकारी यांनी चौकशी करावी तसेच हा जुना अरुंद दगडी पुल पाडुन त्याठिकाणी नविन पुल बनवावा, अशी मागणी मनसेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदरील मागणीनुसार तो अरुंद जुना पुल पाडुन नवीन पुल तयार करावा व तो धोकादायक जुना पुल का पाडला नाही याची चौकशी करून संबंधित अधिका-यावर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणा-या नुकसानीस अधिकारी व कार्यालय जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनायक महींद्रकर, दक्षिण तालुकाध्यक्ष मनोज बचुटे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख यांच्या स्वाक्षरी आहेत.
