नळदुर्ग, दि. 15 : नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याच्या कामास औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली असताना संबंधितांनी शेतक-यांना दमदाटी करुन नळदुर्ग पोलीस ठाण्यात बोलावुन वारंवार त्रास देत असल्याने याविरुध्द येत्या दि. 27 ऑक्टोबर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त शेतक-यांच्यावतीने एकदिवसीय "झोप काढू" आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिका-यांना निवेदनाद्वारे पांडुरंग सखाराम निकम यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 662 रस्त्याच्या कामासाठी संपादित करण्यात येणा-या जमिनीची संयुक्त मोजणी करुन त्या जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दि. 28 मार्च 2019 रोजी तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग, येडोळा, वागदरी, गुजनूर, शहापूर, गुळहळ्ळी व निलेगाव येथील शेतक-यांनी याचिका दाखल केल्याने संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सदरील प्रकरणास दि. 1 एप्रिल 2019 रोजी न्यायालयाने मनाई आदेश दिलेले असताना सुध्दा संबंधित विभागाचे अधिकारी भिमाशंकर मिटकरी व गुत्तेदार यांनी शेतक-यांना दमदाटी करुन पोलीस बळाचा वापर करुन गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचे नमूद करुन नळदुर्ग पोलीसांकरवी शेतक-यांना फोन करुन सतत त्रास देत आहेत. या संदर्भात अनेकवेळा नळदुर्ग येथे पोलीस ठाण्यात येवून वेळोवेळी कागदोपत्राची पुर्तता करुनसुध्दा पोलीसांकडून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या विरोधात मंगळवार दि. 27 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोप काढू आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिका-यांकडून होणारा अन्याय दुर करण्याची मागणी पांडुरंग निकम यांनी केली आहे. निवेदनाची एक प्रत माहितीस्तव जिल्हा पोलीस अधिक्षक यांना देण्यात आली आहे.
