तुळजापूर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणांचे आराध्य दैवत आई श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर उघडण्यात यावे, यासाठी मंगळवार दि. 13 ऑक्टोबर रोजी तुळजापुर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री तुळजाभवानी मातेचे मंदीरासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती तुळजापुर नगरपरिषदचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी एका प्रसिद्धी पञकाद्वारे माहिती दिली आहे. 

संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे गेल्या सात माहिन्यापासुन म्हणजे दि. १७ मार्चपासुन श्री तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने अनेक पुजाऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे उपजिविकेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. तुळजापूर शहराचे संपूर्ण अर्थकारण हे श्री तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून असल्याने शहराचे अर्थकारण बिघडले आहे. शहरातील व्यापारी व पुजारी वर्गाना शारदीय नवराञ महोत्सवाची आशा होती. मात्र शारदीय नवरात्र महोत्सव यावर्षी भाविकाविना होत असल्यामुळे पुजारी व व्यापा-यांना मोठी पंचायत झाल्याने श्री तुळजाभवानी मंदिर तात्काळ उघडण्यात यावे, यासाठी तुळजापूर तालुक्याचे भाजपाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. 

या संदर्भात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालय तुळजापूर येथे आज दि. 11 रविवार रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत मंगळवार दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार समोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय झाला असून सदरील लाक्षणिक उपोषणामध्ये सर्व व्यापारी, पुजारी बांधवानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे. सदरील लाक्षणिक उपोषण आंदोलन हे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली होत आहे. सदरील बैठकीस भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सदस्य उपस्थित होते.
 
Top