काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीसह सावरगाव, सुरतगाव व तामलवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आ.सतिश चव्हाण यांच्या प्रचारार्थ प्रा. अभिमान हंगरकर, प्रा. अश्पाक शेख, प्रा. रणजित गायकवाड आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पदाधिकारी, शिक्षक, पदवीधरांची संयुक्त आढावा बैठक घेऊन व पदवीधरांच्या, शिक्षकांच्या समस्या जाणून घेत पदवीधर निवडणुकी संदर्भात व उमेदवार आ.सतिश चव्हाण यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. अभिमान हंगरकर म्हणाले की, मराठवाड्याचे प्रश्न विधीमंडळात सातत्याने मांडणारे व मराठवाड्यातील समस्यांची जाण असणारे आमदार म्हणून ते परिचित असून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल प्रवेशासाठी असणारा 70-30 हा फॉर्म्युला रद्द करण्यासाठी प्रयत्न करुन त्यामध्ये त्यांनी यश मिळविले म्हणून मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेशासाठी फायदा झाला. ते पाणी प्रश्न, औद्योगिक विकास, बेरोजगारी, पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न, शाळा अनुदान, जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. एक तप आमदार राहिलेले आ.सतीश चव्हाण 'पदवीधर' या निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा आहेत. अशा मराठवाड्यातील प्रश्नांची जाण असणाऱ्या आपल्या हक्काचे, आपल्या भागातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांना हॅट्रिक मिळवून देण्यासाठी त्यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन बहुमतांनी निवडणून आणण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उपस्थित पदवीधर, शिक्षक, पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला.यावेळी प्रा. अभिमान हंगरकर, प्रा. रणजित गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय विभागाचे प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव, प्रा. भारत गुरव, करीम बेग यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, शिक्षक, पदवीधर उपस्थित होते.