अचलेर : जय गायकवाड
कोरोना या रोगाने संपूर्ण जगाला हैराण करून सोडले आहे. या रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन,मार्च २०२० पासून शाळा बंद केल्या होत्या. साधारण आठ महिन्यांच्या नंतर असा निर्णय घेतला की, जरी हा रोग भयंकर असला तरी विद्यार्थ्यांचे करीयर ही महत्त्वाचे आहे हा विचार करून शासनाने आजपासून ९ ते १२ वी चे वर्ग शासनाच्या नियमांच्या चौकटीत राहून सुरू करावेत असा आदेश काढला आणि या आदेशाचे पालन करीत आज लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेची घंटा वाजली.
शाळेत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचे करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख चव्हाण आर.एस. यांनी भेट देऊन नियोजन सुव्यवस्थित असल्याची खात्री केली. शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच वर्ग भरवत असल्याचे मुख्याध्यापकानी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांचा ही उत्तम प्रतिसाद पहावयास मिळाला.