उस्मानाबाद, दि. 23 : मराठवाड्यातील पहिला तेरणा सहकारी साखर कारखाना मागील १० वर्षांपासून बंद असल्याने हजारो कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले. गतवर्षी समाधानकारक पाऊस व यावर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढल्याने पुढील वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी तेरणा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया राबवून कारखाना सुरू करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यंदा तेरणा कार्यक्षेत्रासह जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यासाठी किमान पुढच्या वर्षी तेरणा कारखाना सुरू होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळासह भेटण्याची विनंतीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. तेरणा कारखाना बंद असल्याने ढोकीसह परिसरातील सर्व व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे तेरणा पुन्हा सुरू होवून त्यास गतवैभव प्राप्त व्हावे, अशी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. परंतु, याकरीता कारखान्यावर सभासदांनी निवडुन दिलेले संचालक मंडळ आवश्यक अाहे. तेरणा कारखान्याच्या कर्जापोटी महाराष्ट्र शासनाने उस्मानाबाद जिल्हा बँकेला थकहमी दिलेली १२४ कोटी ५० लाख रुपयांची रक्कमही मिळणे गरजेचे आहे. कारखाना सुरू झाल्यास शेतकरी सभासदांचे हक्क अबाधीत राहतील आणि त्यांचे हित जोपासत बँकेची देखील वसुली होईल. पिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास मदत होईल. यापूर्वी जिल्ह्यातील बाणगंगा व भाऊसाहेब बिराजदार हे दोन्ही सहकारी साखर कारखाने अशा पद्धतीने संचालक मंडळाच्या देखरेखीखाली दीर्घकालीन मुदतीवर भाड्याने दिले असून ते सुरळीतपणे सुरू आहेत. त्यामुळेे तेरणा कारखान्याची निवडणूक घेऊन तो सुरू करावा, थकहमीची रक्कम जिल्हा बँकेस मिळावी, तेरणा कारखाना सभासद शिष्टमंडळाला भेटण्यास वेळ द्यावी आदी मागण्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केल्या आहेत.