उस्मानाबाद, दि. 22 : बेंबळी (ता. जि. उस्मानाबाद) येथे वार्ड क्रमांक पाच मध्ये अस्वच्छ व गलिच्छ ठिकाणी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम केले जात आहे. यामुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येणार असून तातडीने हे बांधकाम थांबवावे अशी मागणी दक्षता फाउंडेशनचे अध्यक्ष गालीब पठाण यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात दक्षता फाउंडेशनचे अध्यक्ष पठाण यांनी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेंबळी येथे वार्ड क्रमांक पाच मध्ये होत असलेली अंगणवाडी ही अतिशय घाण, अस्वच्छ व गलिच्छ ठिकाण असलेल्या सरकार वाडा परिसरात होत आहे. सदर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून महिलासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. येथे अनेक दिवसांपासून मैला तुंबून आहे. यामुळे येथे सातत्याने दुर्गंधी पसरत असते. अशा वातावरणात अंगणवाडी इमारतीचे बांधकाम झाल्यास बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी बालके आजारी पडून दुर्धर व संसर्गजन्य आजार कायमचे जडू शकतात.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या उद्दिष्टानुसार बालक सुदृढ व निरोगी राहण्याचे अपेक्षित आहे. या उद्दिष्टाला अंगणवाडीचे बांधकाम हरताळ फासत असल्यासारखे आहे. त्यामुळे संबंधित बांधकामाची पुनर्तपासणी करून बांधकाम थांबवा, अन्यथा परिसरातील नागरिक व बालकांचे पालक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात दक्षता फाउंडेशनचे अध्यक्ष गालिब पठाण यांनी दिला आहे.