उस्मानाबाद, दि. 30 : तुळजापूर तालुक्यातील मानेवाडी येथील गावठाण जमिनीत प्लॉट पाडून बेकायदेशीररित्या जमीन विक्रीचे व्यवहार करणार्‍या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ येत्या 9 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनादवारे  तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी यांना  दिले आहे.

मानेवाडी ता. तुळजापूर येथील सर्वे नं. 272/ब/58/2 मध्ये असलेल्या गाठवण क्षेत्रात  ग्रामसेवक , सरपंच , उपसरपंच याच्यासह संबधितानी संगनमत करून बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून विक्री केली आहे. हा मोठा आर्थिक घोटाळा असून या प्रकरणाची चौकशी करून सर्व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी गटविकास अधिकार्‍यांकडे केली होती. गटविकास अधिकार्‍यांनी याबाबत चौकशी केली मात्र दोषींवर कारवाई केली नाही. उलट बेकायदेशीर जमिनीनी पाडलेले प्लॉट खरेदी करणार्‍या व्यक्तींना खरेदीखत करून देवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

खरेदीखत झाल्यास प्लॉटधारकास त्याचा ताबा देवून आर्थिक घोटाळा केला जात आहे. याला संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी शेतकरी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना पाठीशी घालून त्यांच्यावर होणारी कारवाई थांबविली आहे. जोपर्यंत याप्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत 9 डिसेंबरपासून ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य शहाजी हाके, महावीर सगट, विजय देवकर, स्वाती माने, शालूबाई शरणप्पा बर्वे, कविता हाके यांच्यासह ग्रामस्थ विठ्ठल लकडे, लक्ष्मण माने, दगडू लकडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, ग्रामविकासमंत्री व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आदिसह संबधिताना देण्यात आल्या आहेत.

 
Top