तामलवाडी, दि. 26 : राज्यातील औरंगाबाद तसेच विविध विभागातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर रोजी होत असुन या निवडणुकीमध्ये मराठा पदवीधर मतदारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा विचार करूनच मतदान करावे असे आवाहन शिवसेवक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी मराठा पदवीधर मतदारांना तुळजापूर लाईव्हशी बोलताना केले आहे.
राज्यामध्ये औरंगाबादसह विविध विभागांच्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक चार दिवसावर येऊन ठेपली आहे. मराठा आरक्षणचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असुन मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असल्याने हजारो मराठा विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील व त्यांचे सहकारी हे मराठा समाजाच्या व मराठा विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत.
मराठा समाजाला डावलून नोकरी भरती करण्याचे कारस्थान चालू असताना मराठा समाजाचा विचार करुनच नोकर भरती करावी अन्यथा नोकर भरती होऊ देणार नाही असा पवित्रा मराठा समाजाने घेतल्याने शासनाला नोकर भरती पुढे ढकलावी लागली.कोणत्या प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्यायचे यावरून सुध्दा राजकारण केले जात आहे. मराठा समाजाच्या हजारो युवकांना आज पदवी घेऊन, उच्च शिक्षण घेऊनसुद्धा नोकरी मीळत नसल्याने दरवर्षी हजारो, लाखो मराठा तरुण बेरोजगार फिरत आहेत याचा कोण विचार करणार? असा सवालही गायकवाड यांनी बोलताना उपस्थित केला आहे.
दि. १ डिसेंबर रोजी हेच मराठा पदवीधर मतदार मतदान करून हक्काचा पदवीधर आमदार निवडून देणार आहेत. आपण निवडून दिलेला पदवीधर आमदार कितपत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे याची खात्री बाळगूनच मराठा समाजातील पदवीधर मतदारांनी मतदान करावे असे आवाहन शिवसेवक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी मराठा पदवीधर मतदारांना तुळजापूर लाईव्हशी बोलताना केले आहे.
