नळदुर्ग, दि. 26 : उमाकांत मिटकर यांच्या सामाजिक कार्यावर आधारित लिहिलेल्या ‘डिव्हाईन जस्टीस’ या आत्मकथेची दुसरी आवृत्ती देशाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते राळेगणसिद्धी येथे गुरूवार दि.२६ रोजी प्रकाशित करण्यात आली.
सकारात्मक शैलीने लेखन करणारे प्रसिद्ध लेखक दत्ता जोशी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती 7 ऑगस्ट 2020 रोजी महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रकाशीत झाली होती. वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे अल्पावधीतच दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली आहे. इतर भाषिक वाचकांचा विचार करून पहिल्या आवृत्तीस मिळालेला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता पुस्तकाची हिंदी व इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित करणार आहोत असे द कॅटलिस्ट प्रकाशनने सांगितले.
यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, जनसेवा हीच देशसेवा आहे. तरुणांनी निर्व्यसनी राहून सामाजिक कामासाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे. उमाकांत मिटकर यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे.
यावेळी ॲड.अमोल पाटील, अण्णांचे स्वीय सहाय्यक संजय पठाडे, डॉ. उमेश शेळके, राळेगणसिद्धीचे सरपंच लोभेश औटी आदीजण उपस्थित होते.