उस्मानाबाद, दि. 25 : दोन्ही ही प्रमुख पक्षाचे उमेदवार हे स्वत:चा उद्योग वाढीस लावावा म्हणून आमदारकी लढवत आहेत. गेल्या १२ वर्षांत मराठवाडा शिक्षण क्षेत्रात होरपळला आहे. पदवीधरांना स्वाभिमानाने जीवन जगता यावे, म्हणुन आपण निवडणुक लढवित आहोत. तर प्रमुख पक्षाचे उमेदवार एक गुत्तेदारीच्या टेंडरसाठी तर दुसरा उद्योगाच्या व्हेंडरसाठी निवडणुक लढवित आहे. या दोन्ही उमेदवारांना बाजूला ठेवून पदविधरांनी आपल्याला संधी द्यावी, असे आवाहन मराठवाडा पदविधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी पत्रकार परिषदेत केले.

शहरातील पुष्पक पार्क या हॉटेल मध्ये बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मराठवाडा शिक्षक संघाचे व्ही.जी.पवार, राजकुमार कदम, सी.एम माळी, डी.एम बनसोडे उपस्थित होते. गेल्या २२ वर्षांपासून आपण विद्यार्थी चळवळीत आहे. भाजपासाठी आपण मोठया प्रमाणात योगदान ही दिले आहे. उमेदवारी मागताना पंकजाताई मुंडे यांनी माझी शिफारस ही केली होती. परंतू मला उमेदवारी नाकारण्यात आली. पक्षासाठी कोणतेही योगदान नसताना बोराळकर यांना उमेदवारी दिली. 

गोपीनाथ मुंडे यांनी पक्षातील जातीयवाद रोखण्यासाठी काम केले होते. परंतू सध्या पुर्वीसारखेच काम चालू आहे. पक्षांनी उमेदवारी देताना पात्रता न पाहता फक्त बँक बॉलेन्स पाहिला, असाही घणाघाती आरोप पोकळे यांनी पत्रकार परिषदेत केला. गेल्या १२ वर्षांत विद्यामान आमदारांनी किती डीपीडीसीच्या बैठकीत उपस्थिती लावून पदविधरांसाठी निधी मिळविला, असे न करता फक्त गुत्तेदारीसाठीच आमदारकीचा उपयोग केला गेला. पदविधर मतदार संघातील उमेदवारी ही आर्थिक व्यवहार करून दिली गेली. असाही आरोप त्यांनी करून निष्ठावंत कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी असल्याचे ही त्यांनी सांगितले.

 
Top