उस्मानाबाद, दि. 27 : उस्मानाबाद जिल्हा शिक्षक भारती  संघटनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त शिक्षक व शिक्षणासंबधी विविध मागण्यांचे निवेदन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड  व शिक्षणाधिकारी गजानन सुसर  यांच्या मार्फत देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की,  सर्वांना जुनी पेन्शन लागू करा, पात्र शाळांना शंभर टक्के अनुदान द्या, व्हॅकसिन आल्याशिवाय शाळा महाविद्यालय सुरू करू नका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी थर्मल स्कॅनर सॅनिटाजेशन इत्यादी सुविधांसाठी संस्थांना किमान 25OOO हजार आणि कमाल एक लाख रुपयांचा निधी द्या, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरित भरा, सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करा, बक्षी समितीचा खंड दोन  तातडीने प्रसिद्ध करा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांच्या जिल्ह्यातच करा, विषयांना शिक्षक नाकारणारा 28 ऑगस्ट 2015 कला क्रीडा शिक्षकांना हद्दपार करणारा 7 ऑक्टोबर 2015 आणि रात्रशाळा संकटात टाकणारा 17 मे 2017 चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय मागे घ्या, वस्तीशाळा शिक्षक आणि अप्रशिक्षित शिक्षण सेवक यांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरा,  वीस पटाच्या आतील शाळा बंद करू नका ,सहाय्यक शिक्षक परिक्षा परिविक्षाधीन कालावधी कमी करा, अर्धवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तासिका तत्त्वावर काम करणारे सर्वच शिक्षकांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करा, संस्थांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदान सुरू करा ,वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट लागू करा, आयटी विशेष शिक्षकांना वेतन मंजूर करा, सावित्रीबाई फुले ,फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना लागू करा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्ष बाल संगोपन रजा द्या, खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करा, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

यावेळी शिक्षक भारती संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे ,उपाध्यक्ष प्रवीण गुरव ,सचिव भरत मोरे, प्रमुख कार्यवाह अबीद अब्बास पटेल, संपर्कसचिव गोकुळदास नेरे, कार्यवाह शेषनाथ वाघ, सहसंपर्क सचिव नानासाहेब बोराडे ,महिला विभागप्रमुख शैलजा भस्मे, कैलास बोंगरग, कळंब तालुकाध्यक्ष  ज्योतिराम सोनके, तुळजापूर तालुकाध्यक्ष तानाजी म्हेत्रे, एम.जी. पवार, लोहारा तालुकाध्यक्ष अनिल गाडेकर, सत्यवान गायकवाड, पांडुरंग पवार, विजय वडवराव आदींसह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

 
Top