तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गा लगतच्या नागरीकांना ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. या घाणीमुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावामध्ये स्वच्छता राखून जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी शासनस्तरावर अनेक योजनांच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी लाखो रूपये  खर्च केले जात आहेत. काही गावांनी गाव स्वच्छता करून पारितोषिके मिळवली आहेत. परंतु अनेक गावामध्ये स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे दिसुन येत आहे. 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथेही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील काही चिकन विक्रेते हे कोंबडीची पंख व टाकाऊ मटनाची घाण हे पाण्याच्या टाकीच्या पुढील बाजुस पर्यायी रस्त्यावर टाकत असल्याने सकाळी व्यायाम करण्यासाठी जात असलेल्या महिला, पुरुष व लहान मुलांना तेथील घाण, दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

तसेच चव्हाण नगर परीसराला पाणीपुरवठा करणा-या पिण्याच्या पाण्याच्या टाकी शेजारी गटारीचे घाण पाणी साचत असुन डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर गावात लघुशंका करण्यासाठी सार्वजनिक मुतारीची व्यवस्था नसल्याने कोरोना सारखे भयंकर आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावाजवळच रस्त्यालगत टाकत असलेली मटनाची घाण बंद करावी अशी मागणी आता नागरीकांमधुन होत आहे. तसेच याबाबत ग्रामपंचायतीस वारंवार सांगुनही काहीच उपाययोजना होत नसल्याचेही नागरीकांनी बोलताना सांगितले आहे. 

घंटागाडी, मुता-या धूळखात पडुन

गावामध्ये कचरा गोळा करण्यासाठी व जनतेला लघुशंका करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून घंटागाडी व फायबर मुतार्या खरेदी करण्यात आल्या परंतु ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार पणामुळे मुतार्या गेली वर्षभरापासून धूळखात पडुन आहेत. तर गेली दोन महिन्यापासून घंटागाडीही धूळखात पडुन आहे.

पन्नास डस्टबिन झाले गायब

रस्त्यावर कचरा पडु नये यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने १४ वित्त आयोगाच्या निधीतून पन्नास डस्टबिन खरेदी करण्यात आले.रस्त्यावर काही ठिकाणी डस्टबिन ठेवण्यातही आले परंतु कालांतराने रस्त्यावर ठेवलेले सर्वच्या सर्व डस्टबिन गायब झाले. ते कुठे गेले, कुणी घेऊन गेले याची साधी चौकशीदेखील ग्रामपंचायतीने केली नसल्याची चर्चा नागरीकामधुन होत आहे.

 
Top