नळदुर्ग, दि. 10 : वात्सल्य सामाजिक संस्था सामाजिक क्षेत्रातील अनेक विषयात काम करते. यात जलसंधारण, गोशाळा, अनाथ मुलांना शैक्षणिक मदत, वृक्ष लागवड व संगोपन, एकल महिला यांचा समावेश आहे. समाजातील अनेक सह्रदयी व्यक्तींच्या मदतीने वात्सल्यने एकल महिलांमध्ये अधिक जोमाने व शाश्वत स्वरूपाचे काम करण्याचा निर्धार केला आहे.

एकल महिला श्रेणीतील भगीनींचे  प्रश्नच जगावेगळे आहेत,जगण्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या मरण यातना, मुलाबाळांसह महिलेची होणारी वाताहत,तारुण्यअवस्थेतील एकल महिलांकडे बघण्याचा काही व्यक्तींचा विकृत दृष्टिकोण, जगण्यातील हरवलेला सन्मान,शासनाच्या योजनांपासून वंचित असणे,असे एक नवे असंख्य प्रश्न आहेत. याचे मूळ कारण म्हणजे आर्थिक परावलंबित्व.

वात्सल्यने या भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प केला आहे. तुळजापूर तालुक्यातील 340 महिलांच्या सर्वेक्षणानंतर 78 महिलांमध्ये वात्सल्यने  काम सुरू केले आहे.

दिवाळी आपल्या सर्वांचा आनंदाचा,मांगल्याचा सण असल्याने दिवाळीतील भाऊबीजेला “ताईसाठी एक साडी” या उपक्रमाची सुरुवात कसई ता. तुळजापूर येथून झाली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी बाळासाहेब हंगरगेकर, सुचिता हंगरगेकर, व्यंकट म्हमाने, प्रवीण म्हमाने, संस्थेच्या अध्यक्षा प्रणिता शेटकार, परमेश्वर म्हमाने, अमोल घोंगटे, एकल महिला उपस्थित होत्या.

 
Top