चिवरी : राजगुरू साखरे

 तुळजापूर तालुक्यातील  चिवरी परिसरात  मागील चार दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाची फूलगळ होत आहे, तसेच अळ्यांचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे, त्यामुळे तूर पीक संकटात आले आहे .खरीप हंगामातील तुरीच्या पिकावर वातावरण बदलामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असून,फुलगळही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.

यावर्षी चांगला पाऊस पडल्याने तूरीचे पीक बहारात आहे. मात्र गेल्या चार दिवसापासून सतत वातावरणात बदल होत आहे दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे याचा परिणाम तुरीच्या पिकांवर होतं आहे. सध्या हे पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे मात्र याच महत्त्वाच्या अवस्थेत तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ होऊ लागली असून शेंगावरही अळ्यांनी   हल्ला  चढविला आहे.

 या अळींचा वेळीच बंदोबस्त नाही झाल्यास उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी तुर फवारण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. यासाठी हजारो रुपयाच्या औषधांची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागत असल्याने  शेतकऱ्यांच्या उत्पादनात खर्चात वाढ होत आहे.त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतातुर  झाला आहे.

 
Top