तुळजापुर : कुमार नाईकवाडी
साडेतीन शक्ती पीठापैकी एक पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेची तुळजाई नगरी शुक्रवार दि. २७ रोजी भाविकांच्या गर्दीने फुलली होती. तत्पूर्वी पहाटे १ वाजता श्री देवीचे चरण तिर्थ होऊन भाविकांसाठी दरवाजे खुले करण्यात आले होते. सकाळी ६ वाजता श्री देवीजीस पंचामृत अभिषेक घालुन वस्त्रोअलंकार नित्योपचार पूजा करण्यात आली.
संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे गेली आठ महिने श्री देवीचे मंदीरात भाविकांना मंदीरात प्रवेश बंद केला होता. दि. १४ नोव्हेंबर रोजी श्री देवीचे मंदीर राज्य शासनाच्या निर्णयानुसार खुले करण्यात आल्यानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान मार्फत संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर योग्य उपाययोजना श्री देवीच्या दरबारात करण्यात आल्यानंतर मोजक्याच भाविकांना प्रवेश देण्यात येत असल्यामुळे पहाटेपासुन अॅक्सीस पास काढण्यासाठी शहरातील पास केंद्रावर भाविकांची मोठी गर्दी पडत आहे. त्यामुळे अँक्सीस पास लिमिट संपल्यावर बंद करीत आहेत.
त्यानंतर पेड दर्शन सहशुल्क पासचा दर एका व्यक्तीस 300 रुपये असल्यामुळे सर्वसामान्य भाविकांना न परवडणारा सहशुल्क पास त्यामुळे सर्वसामान्य भाविक महाद्वार बाहेरुनच कळस दर्शन घेत आहेत. पेड दर्शन सहशुल्क पास च्या माध्यमातून श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानला मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा लाभ प्राप्त होत आहे. मोफत ॲक्सीस पास वाढविण्याची मागणी भाविकामधुन होत आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजता मोफत ॲक्सीस पास बंद झाल्यामुळे अनेक भाविकांनी महाद्वार बाहेरूनच कळस दर्शन घेतले. शहरातील वाहनतळे बसस्थानक शहरातील बाजार पेठा भाविकांच्या गर्दीने गजबजुन गेल्या होत्या. येत्या शनिवार व रविवार सुट्या आल्यामुळे श्री देवीच्या दरबारात गर्दी होण्याचे चिन्हे दिसत आहेत तरी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानने मोफत ॲक्सीस पास वाढविण्यात यावेत, अशी मागणी शहरवाशियातुन होत आहे.
