तुळजापूर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शनिवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी कोजागीरी पोर्णिमे निमित सोलापूरच्या शिवलाड तेली समाज बांधवाच्या काठ्या सोबत छबीना काढून कोजागिरी पोर्णिमाची सांगता करण्यात आली.

तत्पूर्वी सोलापूर येथील शिवलाड तेली समाज बांधवाच्या मानाच्या काठ्या येथील श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य भोपे पुजारी सचिन प्रकाश पाटील यांच्या पाटील वाड्यात सोलापूर हुन येऊन विसावा घेतल्या होत्या. शनिवारी सायंकाळी पाटील वाड्यात सोलापूर येथील शिव लाड तेली समाज बांधवाच्या काठ्याचे पुजन श्री देवीचे पुजारी सचिन पाटील यांच्या परिवाराच्या हस्ते झाले. या वेळी शिवलाड तेली समाज बांधवाचे काठ्याचे मानकरी विलास म्हेञे, अमित मंठाळकर, विश्वनाथ मंठाळकर, नेताजी मंठाळकर, शैलेंद्र मुरुडकर, केशव सोनसळे, सिद्राम मंठाळकर, अर्जुन मंठाळकर, राजेश सोनसळे, प्रशांत मंठाळकर आदीसह शिवलाड तेली समाज बांधव उपस्थित होते.

यानंतर शिवलाड तेली समाज बांधवाच्या काठ्या श्री तुळजाभवानी मातेच्या राजे शहाजी महाद्वार येथे आल्यानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त तथा तहसिलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले आदीसह मंदीर कर्मचारी यांनी काठ्याचे स्वागत केले. संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे मोजक्याच मानकरी यांना मंदीरात सोडण्यात आले होते.

काठ्याचे श्री तुळजाभवानी मंदीरात आगमन होताच शनिवारी सायंकाळी मंदीर प्रागंणात "आई राजा उदो उदो" च्या गजरात काठ्यासह छबिना काढण्यात आला. यानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी व धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांच्या वतीने शिवलाड तेली समाज बांधवाचे मानकरी यांचा श्री देवीची साडी चोळी, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजीबुवा यांनी श्री तुळजाभवानी मंदीरात कोजागिरी पोर्णिमेचा जोगवा मागून सांगता करण्यात आली.

 
Top