नळदुर्ग, दि. 25 : महावितरणच्या विद्युत वाहिनीचे घर्षण होऊन त्याची ठिणगी पडुन सुमारे 15 एकर क्षेत्रावरील ऊसाचे पीक जळून खाक झाले आहे. या आगीच्या दुर्घटनेत शेतातील ठिबक सिंचन व पीव्हीसीचे पाईपसह बैलगाडी जळून खाक झाली. तर सुर्दैवाने बैलजोडी वाचली असून जखमी झाली आहे. ही घटना नळदुर्ग शिवारातील नळदुर्ग व अक्कलकोट रस्त्यालगत शुक्रवार दि. 25 डिसेंबर पहाटेपूर्वी घडली. या घटनेत जवळपास 15 लाखाचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नळदुर्ग शिवारातील सर्व्हे नं. 108/1 व 108/2 मधील दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान सर्व्हे नं. 108/1 मधील शेतकरी दर्शन सिद्राप्पा शेटगार यांचे क्षेत्र 2 हेक्टर 14 आर व सर्व्हे नंबर 108/2 पदमीनबाई धर्मराव शेटगार यांचे क्षेत्र 4 हेक्टर मधील ऊस विद्युत वाहनीचे तारेचे घर्षण होऊन त्याची ठिणगी पडून उभा ऊस पीक जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर दर्शन शेटगार यांच्या क्षेत्रामधील ठिबक सिंचन पाईप क्षेत्र 1 हेक्टर 7 आर व पदमीनबाई शेटगार यांच्या क्षेत्रातील पीव्हीसी पाईप 7 नग व बैलगाडी जळून खाक झाले. अंदाजे नुकसान 15 लाख रुपये नुकसान झाले आहे. सदरील घटनेचा पंचनामा तलाठी टी.डी. कदम यांनी केला. 

दरम्यान, ही घटना समजताच परिसरातील शेतक-यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे दिवसभर परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. कर्जबाजारी असलेल्या नुकसानग्रस्त शेतक-यास शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.

 
Top