चिवरी : राजगुरु साखरे
सर्वसामान्यांसाठी दिवाळी कायमच दिवाळी काढणारी असते असे बोलले जाते. यंदा मात्र या खर्चाला खाद्यतेलाची जोरदार फोडणी बसली. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. दिवाळीनंतरही खाद्यतेलाचे दरवाढ सुरू असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांसमोरची संकटाची मालिका संपण्याची नाव घेत नाही. आधीच कोरोना च्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचा रोजगार हिरावला आहे.
सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच भर म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या सर्व खाद्यतेलाचे भाव वधारले आहेत. सोयाबीनच्या तेलाने शंभरी पार केली आहे त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणीची आर्थिक बजेट कोलमडले आहे. गत काही दिवसापासून खाद्य तेलाच्या भावात दररोज वाढ होत आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनची उत्पादन निम्म्यावर आल्याने तेलाचे भाव वाढल्याचे व्यापारी वर्ग बोलत आहेत. लग्नसराईत पाम तेलाची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे आयात महागल्यामुळे पाम तेलाचे भावही वाढले आहेत. बाजारात प्रति किलो शंभर रुपये भाव आहे, परंतु आहारात सर्वाधिक सोयाबीन तेलाचा वापर होतो. इतर तेलापेक्षा सोयाबीनचे तेल स्वस्त आहे. पण आता सोयाबीन तेलाने शंभरी पार केली आहे.
खाद्यतेलाचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून सर्वसामान्य कुटुंबांना याचा मोठा फटका बसला आहे. कोरोना संकटामुळे अगोदरच पैशाची चणचण आणि त्यात जीवनावश्यक दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे महिला वर्गाचे आर्थिक जुळवाजुळव करताना दमछाक होताना दिसत आहे.