नळदुर्ग, दि. 09 : शहरातील नागरिकांची घर पट्टी व पाणी पट्टीची सक्तीने वसुली करू नये. तसेच नागरिकांचे पाणीपुरवठा कनेक्शन बंद करू नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नळदुर्ग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करययात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील पालिकेची पाणीपट्टी वसुली सुरू झाली असून जे ग्राहक पाणीपट्टी भरत नाहीत त्यांचे नळ कनेक्शन बंद करीत आहेत. पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होत असते. परंतु गेल्या आठ महिन्यापासून कोरोनामुळे अनेकजणांच्या नोक-या गेल्या आहेत. व्यापारात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बँकांचे हप्ते, वीज बिल हे सगळे एकदाच तगादा लावत असतील तर सर्व सामान्य नागरिक पैसे भरणार कुठून ? अशात घर सांभाळणे ही गरजेचे आहे. असे असताना सद्यस्थिती लक्षात घेऊन पालिकेनी सक्तीची वसुली करू नये व नळ कनेक्शन बंद करू नये, अशी विनंती करुन सदरील विषयाची दखल नाही घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके यांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी संदीप वैद्य, अमीर फुलारी आदीजण उपस्थित होते.