उस्मानाबाद, दि. 15 : रत्ननिधी ट्रस्ट मुंबई व एकता फाऊंडेशन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जयपूर फुट शिबिरा मुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम पाय लागले असून ते पुन्हा चालू लागले आहेत. या शिबिरा मध्ये 77 दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला आहे. यामध्ये दिव्यांग बांधवांची तपासणी करूनच त्यांना रत्ननिधी ट्रस्ट मुंबई यांच्या विशेष सहकार्याने व एकता फाऊंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने दोन दिवसीय शिबीरांमध्ये जयपुर फुट, हात, कँलिपर्स व कुबड्याचे वाटप करण्यात आले.

या शिबिरामुळे दिव्यांग बांधवांना मोठी मदत झाली असून चांगल्या दर्जाचे साहित्य पूर्णतः मोफत दिले आहे. तज्ञांकडून तपासणी झाल्यानंतर रुग्णाच्या मापाचे पाय व हात तयार केलेले असून रुग्णास व्यवस्थित बसवुन व त्यास चालायला लावुनच घरी सोडले जात होते. 

रत्न निधी ट्रस्ट व एकता फाऊंडेशन यांनी राबवलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून असे उपक्रम घेणाऱ्या संयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख यांनी व्यक्त केले.

या ठिकाणी आलेले सर्व दिव्यांग बांधव हे खरेच गरजवंत असून अशा गरजवंतापर्यत हे साहित्य पोहोचत असल्यामुळे हि बाब खुपच आनंदाची आहे अशा कार्यक्रमासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन सदैव सोबत आहे अशी ग्वाही यावेळी डाँ.सचिन देशमुख यांनी दिली. 

सामाजिक बांधिलकीची जाण ठेवणारे सेवेच्या मार्गावर चालतात याचा अर्थाने रत्न निधी ट्रस्ट मुंबई व एकता फाऊंडेशन उस्मानाबाद काम करत असून त्यांच्या या कार्यामध्ये सर्वानी सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीकांत जाधव यांनी व्यक्त केली.

उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यामध्ये आम्हांला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल एकता फाउंडेशन उस्मानाबाद व समस्त उस्मानाबाद जिल्हावासियांचे आभार मानत दरवर्षी अशा शिबिराचे आयोजन करण्यात यावे व त्यासाठी लागणारे सर्व साहित्य हे रत्ननिधी ट्रस्ट उपलब्ध करून देईल अशी ग्वाही नंदा ठक्कर यांनी दिली. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नंदा ठक्कर तर प्रमुख पाहुणे म्‍हणून व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीकांत जाधव, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख, सुवर्ण सराफ असोसिएशन अध्यक्ष संजय गणेश, भारतीय जैन संघटना उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष अतुल अजमेरा, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष लोमटे व आभार प्रदर्शन विशाल थोरात यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात अभिलाष लोमटे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका व्यक्त करत मदत करणाऱ्या सर्वाचे मनापासून आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद देशमुख, शिवलिंग गुळवे, अभिषेक झाल्टे, सचिन बारस्कर, किरण वारे, महेश गरड, आदींनी परिश्रम घेतले.

 
Top