तामलवाडी, दि. 27 : तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी येथे शनिवार दि.26 रोजी श्री.बाळूमामा पालखी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पालखी महोत्सवात गावातील शेकडो सुविसिनी महिलांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग नोंदवला होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर येथील श्री. बाळूमामा देवालय संस्थानच्या अकरा नंबर पालखीचे सोमवार दि.21 रोजी गोंधळवाडी येथे आगमन झाले होते. गत पंधरा वर्षापासून बाळुमामाची हि पालखी महाराष्ट्र, कर्नाटक आदि राज्यातील गावोगावी फिरत असते. पालखी प्रमुख सांगोलकर कारभारी, जेजुरीकर  प्रभारी, राजू अनुसे, लिंगाप्पा यांच्या अधिपत्याखाली या पालखीची देखभाल केली जाते. या पालखीसमवेत चार हजार मेंढ्यांचा कळप असून यामध्ये बाळूमामाच्या घोड्याचाही समावेश आहे. 

गोंधळवाडी येथील मोहन लक्ष्मण मोठे यांच्या शेतामध्ये श्री.बाळूमामाच्या पालखीचा पाच दिवस मुक्काम होता. या पाच दिवसांमध्ये सकाळी आठ व संध्याकाळी आठ वाजता पालखीची आरती करण्यात येत होती. नंतर दर्शन महाप्रसाद दोन्ही वेळेस वाटप केला जात होता. आप्पा यमगर, रमेश मोटे, अनिल कोळेकर, सौरभ शिरगिरे, संजय शिरगिरे, महाविर मोठे, हनुमंत मोठे, युवराज माने, धनाजी रेड्डी, श्रीराम माने या दात्यांनी अन्नदान केले. 

सकाळच्या पुजेनंतर फटाक्यांच्या आतिषबाजीत, बेल भंडारा खोबऱ्यांची उधळण करत संपूर्ण गावांमधून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान, सावरगाव येथील बिरूदेव ओवीकर मंडळातील सदस्य मारुती गणपती मुळे, अंगद रामा सातपुते, राजेंद्र रामा सातपुते, अरुण रामचंद्र सातपुते, राजेंद्र शिवराम मुळे, शालीग्राम शिवराम मुळे, राहुल ज्ञानेश्वर मुळे यांच्या पथकाने पारंपारिक धनगरी ओव्या, भारुडाचे उत्कृष्ठ सादरीकरन करुन परिसरातुन आलेल्या भाविक भक्तांची मने जिंकली.


 
Top