चिवरी : राजगुरु साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी व उमरगा चिवरी या ग्रामपंचायतीकडून गुड मॉर्निंग पथकाचे नियोजन करून, गावामध्ये पहाटेच्या वेळी भेटी देऊन उघडयावर शौचविधी करणार्या नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. तुळजापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या आदेशावरून चिवरी व उमरगा चिवरी या ग्रामपंचायतीकडुन ही मोहीम राबवण्यात आली आहे.
या पथकाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडुन परिसरात उघडयावर शौचविधी करणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन गुड मॉर्निंग करत जनजागृती केली जात आहे, तसेच सर्व नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा, बाहेर उघड्यावर शौचास जाऊ नये, शौचालय वापराचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच आपल्या गावाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा, असे आव्हान करण्यात येत आहे. ही मोहीम राबवण्यासाठी ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, लिपिक अनिल देडे, कल्याण स्वामी, धनाजी कोरे आदीसह चिवरी ,उमरगा चिवरी ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम घेत आहेत.