नळदुर्ग, दि. 22 : येथील नगरपालिकेचा कारभार अनागोंदी असून गत चार वर्षात विकास कामाऐवजी अधोगतीकडे वाटचाल सुरु आहे.  नगरपालिकेशी संबंध नसलेल्या कथित भुमीपुत्राने चालवलेल्या गैरप्रकारावर पडदा टाकण्यासाठी नगरसेवकाबद्दल चुकीची व खोटी माहिती देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करीत असल्याच्या प्रकाराबद्दल सर्वपक्षीय नगरसेवकांच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन नगरसेवक नय्यर जहागिरदार यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

रविवारी सायंकाळी नगरसेवक नय्यर जहागिरदार, उदय जगदाळे, शहबाज काझी, निरंजन राठोड, दयानंद बनसोडे, मुश्ताक कुरेशी, विनायक अहंकारी यांनी पञकार परिषद घेऊन नगपालिकेत सुरु असलेल्या गैरकारभाराबद्दल नय्यर जहागिरदार, शहबाज काझी, उदय जगदाळे, मुश्ताक कुरेशी यांनी सडकून टीका करुन गंभीर आरोप केले. सतरा पैकी तेरा नगरसेवक व दोन स्विकृत नगरसेवक एकञ येवून पालिकेत मागील काही वर्षात झालेला गैरप्रकार उघडकीस आणणार असून चार वर्षे विरोधास विरोध नको म्हणून सहका-याची भुमिका घेतली. माञ चार वर्षानंतर आजही  पाणीपुरवठा सहा ते सात दिवसाआड होतो. शहरातील सर्व रस्ते खराब आहेत. अनेक पथदिवे बंद आहेत. या विरोधात आता लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशारा यावेळी नगरसेवकांनी दिला.

नगराध्यक्षा मागील चार वर्षात फक्त सर्वसाधारण सभेसाठी नळदुर्गला आल्या. बाकी वेळा त्या मुंबईत असतात, तर उपनगराध्यक्षाची निवडही मागील दिड वर्षापासून होवू दिली नाही. लोकप्रतिनिधीच्या कुटूंबातील सदस्य पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करणे घटनाबहाय्य असतानाही नगराध्यक्षाचे भाऊ पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतात. कोणत्याही नगरसेवकाने विकास कामात अडथळा आणला नाही माञ जगदाळे यांची आवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे असे म्हणत फेरनिविदा बोलावण्यात जागतिक विक्रम झाल्याचा टोला यावेळी नय्यर जहागीर यांनी लगावला. 

जनतेतून नगराध्यक्षा निवडून आल्यामुळे १५ टक्के निधी नगराध्यक्षा विकासकामासाठी रितसर निविदा प्रक्रिया राबवून खर्च करू शकतात. माञ बहुतांशी विकास कामे विषय समिती व सर्वसाधारण सभेपुढे न आणताच मर्जितल्या निविदा मान्य करुन केली जात आहेत असा आरोप काँग्रेस नगरसेवक शहबाज काझी यांनी केला.

या पत्रकार परिषदेस भाजपाचे शहराध्यक्ष पदमाकर घोडके, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार संरक्षण समितीचे शहराध्यक्ष शिवाजी नाईक, सचिव भगवंत सुरवसे, विलास येडगे, तानाजी जाधव, श्रीनिवास भोसले, दादासाहेब बनसोडे, उत्तम बनजगोळे, पांडुरंग पोळे, जहीर इनामदार, लतीफ शेख, सुनिल गव्हाणे, जिलानी कुरेशी, फारुख कुरेशी आदीजण उपस्थित होते.

 
Top