तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील गायरान येथे ओढ्यावर बांधलेल्या बंधा-याला गळती लागली असुन, अनेक बंधा-याचे दरवाजे गायब झाले असल्याने पावसाचे पाणी साठवण होत नाही. पाणी थांबत नसल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे शेतक-यांनी बोलताना सांगितले आहे.

पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ नये व तेच पाणी दिर्घकाळ राहुन हंगामी शेतीसाठी त्याचा फायदा शेतक-यांना व्हावा, तसेच विहीरी व बोअरवेल यांचा पाणी साठवण क्षमता वाढुन शेतीसाठी व गावासाठी पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाने पाणी आडवा पाणी जिरवा या अंतर्गत वनराई बंधारे, कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे  बांधले दोन वर्षांपूर्वी तामलवाडी येथील गायरान जमीनीजवळ ओढ्यावर एक बंधारा बांधण्यात आला. परंतु या बंधार्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधा-यात साचलले पाण्याची बंधार्याच्या बाजुला रचलेल्या दगडी पौळमधुन गळती होत असल्याचे दिसून येत आहे.

या पाण्याचा गळतीमुळे हंगामी शेतीसाठी तसेच जनावरांसाठी पाणी राहत नसल्याचे बंधारा रिकामा होत असल्याचे तेथील शेतकर्यांनी सांगितले.पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना या गळतीबाबत वारंवार सांगुनही टाळाटाळ केली जात असल्याचेही सांगण्यात आले. तसेच याच ओढ्यावर असलेल्या काही बंधार्याचे दरवाजे गायब झाल्याचे दिसून येत आहे. बंधार्याला दरवाजेच नसतील तर या बंधार्याचा उपयोग काय? असा प्रश्न शेतक-यांना पडत आहे. 

एका गावच्या बंधा-यांची अशी अवस्था आहे. तर मग जिल्हाभरातील बांधलेल्या बंधार्यांची काय अवस्था असेल ? असा सवालही नागरीक उपस्थित करत आहेत. याकडे पाटबंधारे विभागाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. पाणी अडवण्यासाठी व जिरवण्यासाठी बांधलेल्या या बंधार्याला गळती लागली असल्याने तात्काळ तो बंधारा दुरुस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

 
Top