तुळजापूर, दि. 24 : सतीश महामुनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणार या विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला केवळ तुळजाभवानीचा शुभाशीर्वाद म्हणून मिळाली आहे. या पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले करिअर निर्माण करण्यासाठी आणि अभियांत्रिकी शिक्षणाकडे प्रशासनाचे विद्यार्थी त्यांच्या अनुषंगाने लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराच्या निमित्ताने दिली.
येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर जगदे यांचा तुळजापूर स्थानिक पत्रकाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ.जगदे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणारेच्या कार्यकारी सदस्य पदी नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल पत्रकार डॉ. सतीश महामुनी, संजय खुरूद, सचिन ताकमोघे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कारास उत्तर देताना डॉ.जगदे म्हणाले की, माझी झालेली निवड ही तुळजाभवानीचा आशीर्वाद असून महाविद्यालयाचे अध्यक्ष व विश्वस्त यांचे मार्गदर्शन लाभल्याने मी या सदस्यपदी पोचू शकलो. याकामी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व स्थानिक पत्रकार यांचे सहकार्य लाभल्यामुळे आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद खुरूद यांनी केले तर आभार अनिल आगलावे यांनी मानले. यावेळी श्रीकांत कदम, प्रदीप अमृतराव, राहुल कोळी, कुमार नाईकवाडी, सिद्धकी पटेल आदीजण उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मागील दोन-तीन वर्षांमध्ये खूप चांगले यश संपादन करीत येथे झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मधून अभियांत्रिकी क्षेत्रात नोकऱ्या संपादन केले आहेत. अभियांत्रिकी शिक्षण आणि खाजगी क्षेत्रातील नोकरी यासंदर्भात महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते मागील दोन वर्षापासून महाविद्यालयात स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या अनुषंगाने विशेष वर्ग चालवण्यात येत आहेत त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तज्ञ आणि स्पर्धात्मक परीक्षांची अभ्यासक मंडळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. मंदिर संस्थांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी विश्वस्त यांच्याकडून सातत्याने मिळणारे प्रोत्साहन यामुळे आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात करिअर करण्यामध्ये यशस्वी होत आहेत असेही प्राचार्य डॉक्टर शेखर जगदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रदीप हंगारगेकर यांनी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी तयार केलेल्या स्वतंत्र कक्ष अत्यंत दर्जेदार आणि राष्ट्रीय पातळीवरील यांना सोबत घेऊन काम करत असल्यामुळे याविषयी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता असून ते सक्रियपणे यामध्ये सहभागी झालेले आहे. यामुळे महाविद्यालयाच्या अध्यापनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे असे सांगितले.