परंडा, दि. 09 : उजनीचे पाणी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे असल्याने पुढील टप्प्यातील कामे दीड वर्षात पूर्ण करण्याच्या अनुशंगाने तत्काळ आवश्यक मंजूरी व सूचना दिल्या आहेत. सदरील सर्व कामाचा पाठपुरावा सुरुच आहे. प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे अशी माहिती आमदार तथा माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मंगळवारी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, उजनीचे पाणी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे असल्याने नियोजित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वारंवार चर्चा, पत्रव्यवहार पाठपुरावा चालू आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दि. १६ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन उजनीच्या पाण्याची मराठवाडा भागाकरिता नितांत गरज असल्याचे निदर्शनास आणून देत हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक बोलवण्यासाठी विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी आढावा बैठक घेतली. सदरील पाणी मराठवाड्याला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी परंडा- भूम- वाशी मतदार संघातील साकत मध्यम प्रकल्पापर्यंतची कामे हाती घेऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. या कामाचा स्वत दररोज आढावा घेत असल्याचे आमदार सावंत यांनी म्हटले आहे.
मुंबई येथील या बैठकीस मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजय मेहता, प्रधान सचिव विकास खरगे, प्रधान सचिव जलसंधारण लोकेश चंद्र, सचिव प्रकल्प समन्वयक एन. व्ही. शिंदे, उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे आदी उपस्थित होते अशीही माहिती आमदार तानाजी सावंत यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.