कळंब, दि. 16 : कळंब नगरपालिकेतील तीन नगरसेवकांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आले आहे. गटनेते पदासाठी पक्षाला कसलीही कल्पना न देता बैठक आयोजित केल्याप्रकरणी व ती रद्द करण्याचा आदेश पक्षाने दिल्यानंतरसुध्दा पक्षाचा आदेश झुगारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी ही कारवाई केली आहे. या तीन नगरसेवकामध्ये उपगनगराध्यक्ष संजय मुंदडा यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी ही माहिती दिली.
सोमवारी कळंब न.प. च्या उपनेत्या गीता महेश पुरी यांनी नूतन गटनेते निवडची बैठक आयोजित केली होती. नूतन गटनेते म्हणून लक्ष्मण कापसे यांची निवड करण्यात आली. परंतु उपनगराध्यक्ष संजय पांडुरंग मुंदडा, नगरसेविका गीता महेश पुरी व नगरसेवक लक्ष्मण मनोहर कापसे यांनी गटनेतेपदासाठी पक्षाची परवानगी न घेता परस्पर बैठक आयोजित केली होती. तसेच जिल्हाध्यक्ष व पक्षश्रेष्ठी यांनी बैठक रद्द करण्याची सुचना दिल्यानंतरही त्यांनी बैठक घेतली. वरील तिघांनी नगरसेवकांची दिशाभुल करुन पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे राष्ट्रवादीने तातडीची बैठक घेवुन त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी सांगितले.