तुळजापूर, दि. 16 : सोलापुरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा आयशर टेम्पोच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तर एकजण जखमी झाल्याची घटना सोलापूर-उस्मानाबाद महामार्गावर तुळजापुर जवळील आराधवाडी परिसरात बुधवार दि. 16 डिसेंबर रोजी पहाटेपूर्वी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातातील मयत हे बीड नेकनूर ता. केज जि. बीड येथील रहिवाशी आहेत. मयतामध्ये दोन शेतकरी व एका चालकाचा समावेश आहे.
मोहन भागवत मुंडे (वय 50 वर्षे), देवराम धोंडीराम शिंदे (वय 50 वर्षे), सज्जत शकलम शेख (वय 30 वर्षे) सर्व रा. नेकनूर ता. केज जि. बीड असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नाव आहेत. तर भागवत शिवाजी मुंडे असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आयशर टेम्पो क्रमांक एम एच 16 एई 7704 हा सोलापुरकडे कांदा घेऊन जात होता. तुळजापुर शहरातील आराधवाडी भागात बायपास पुलावर सदरील वाहन चालकाचा नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेले भागवत मुंडे यांना उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच तुळजापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज राठोड, पोलीस हवालदार अजित सोनवणे, गणेश पतंगे आदींनी घटनास्थळी भेट दिली.