तुळजापुर : "हिरवा निसर्ग हा भवतीने -जीवन सफर करा मस्तीने" अशा उत्साही मानसिकतेत तुळजापुर तालुक्यातील पिंपळा बुद्रुक येथील ट्रेकर्सनी व्याघ्रगड वासोटा किल्ला यशस्वी सर केला. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून सुमारे दीड तास बोटिंगचा आनंद घेत सर्व जण कोयना अभयारण्यात पोहोचले. कोयना अभयारण्यातून पर्यावरणाचे संवर्धन करत सर्वजण ४२६७ फूट उंच हनुमानाच्या मंदिरापाशी पोहोचले.
डोंगर-दऱ्यासह गड किल्ल्यावर भटकंती करताना, खडतर वाटेवरून चालताना एकमेकांना हात देत केलेली मदत व त्यानिमित्ताने डोंगरदऱ्यातून चालण्याचे अनुभवलेले थ्रील, धुक्यात हरवलेला निसर्ग नजरेतून टिपण्याचा लुटलेला आनंद हे सर्व क्षण अशा सफरीतून अनुभवायला मिळतात.
ट्रेकर्सना खुणावणारा ,निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचा किल्ला म्हणजे वासोटा. सदाहरित घनदाट जंगलाचा विलोभनीय अनुभव घेत या किल्ल्याची सफर स्नेहबंध ग्रुप पिंपळा बुद्रुक यांनी पूर्ण केली. हा किल्ला व्याघ्रगड म्हणूनही ओळखला जातो .साहसी ट्रेकची आवड असणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी हा एक आदर्श किल्ला आहे. किल्ल्यावर पाण्याची टाकी, वाड्याचे अवशेष ,शिवमंदिर असून बाबूकडा नावाचा अजस्त्र कडा हे मोठे आकर्षण आहे.
शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ट्रेकिंगचा अनुभव खूप उपयोगी असतो. निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी व निसर्गाची जपणूक करण्याचे कर्तव्य ही अशामुळे अंगी बाणवते. रोजच्या धावपळीच्या व व्यस्त जीवनशैलीत ताण-तणाव कमी करण्यास व शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्याकामीही याचा फायदा होतो. निसर्गरम्य वातावरणात शुद्ध हवा मिळते , शिवाय श्वसनक्रिया ,रक्तप्रवाह, पचनक्रिया यासाठीही ट्रेकिंग लाभदायी असते .शिवाय निसर्गाचे रंगरूप ,गडावरील सौंदर्य पाहून मनाची प्रसन्नता वाढते व ताण तणाव निवळायला ही मदत होते. यामध्ये प्रा. डॉ. शिवाजी मस्के ,श्री विठ्ठल नरवडे, ज्योतिबा जाधव ,विनोद चुंगे प्रा.प्रमोद चुंगे, बालाजी जाधव मुख्याध्यापक अशोक बगले हे सहभागी झाले होते.
हा संपूर्ण प्रवास घनदाट जंगलांनी वेढलेला असल्याने नितांत सुंदर आणि आनंददायी आहे किल्ला आणि त्यावरून कोयना व सह्याद्रीच्या विलोभनीय दर्शनाने पायपिटीचा थकवा पार निघून जातो अशी भावना ट्रेकर्स श्री. विठ्ठल नरवडे यांनी व्यक्त केली.