नळदुर्ग : एस.के. गायकवाड
आपण एकेविसाव्या संगणकीय विज्ञान युगात वावरत असताना आजही मुलीच्या जन्माचा तिरस्कार करून स्त्रीभ्रूण हत्या, एवढेच नव्हे तर मुलगी जन्माताच अर्भकाला रस्त्याच्या कडेला, किंवा बसस्थानकात कोठे तरी कोपऱ्यात ठेवून जन्मदाती आईच पसार झाल्याच्या घटना पहावयास व ऐकण्यात येतात. अशा किळसवाण्या प्रकाराला फाटा देवून तुळजापूर येथे मुलीच्या जन्माचे वाजतगाजत फुलांचा वर्षाव व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदी वातावरणात स्वागत करून कदम व काळखैर कुटुंबानी समाजात एक आदर्शवत संदेश दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, तुळजापूर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम व तुळजापूर न.प. च्या नगरसेविका वैशाली तानाजी कदम यांची कन्या दिक्षा कदम यांचा तिन वर्षापुर्वी कल्याण येथील अँड.आशितोष काळखैर यांच्यासी विवाह झाला होता. संविधान दिनाच्या दोनच दिवसानंतर दि. २८ डिसेंबर २०२० रोजी तुळजापूर येथील वडणे हाँस्पिटलमध्ये दिक्षा आशितोष काळखैर-कदम यांनी मुलीला जन्म दिला असून दि. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आले. दवाखाना ते हडको येथील कदम निवासापर्यंत वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांचा वर्षाव करुन हर्ष उल्हासित आनंदी वातावरणात घरी आणण्यात आले.
घरी येताच जागतिक पातळीवर स्त्रियांना पहिल्यांदा पुरूषांच्या बरोबर समान हक्क देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध व संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना घटनात्मक अधिकार मिळवून देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेऊन उपस्थितानी बाळाला शुभेच्छा दिल्या.
कदम व काळखैर कुटुंबियांनी कन्या रत्नाचे वाजत गाजत स्वागत करून समाजात एक प्रकारे स्त्री जन्माचा आदर करण्याचा आर्दश निर्माण केला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
वेळी भारतीय बौद्ध महासभेचे विश्वास पांडागळे, रिपाइंचे तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम, प्रा. अशोक कांबळे, सिमाताई कांबळे, नंदा पांडागळे, आप्पा कदम, पृथ्वीराज कदम, अर्चना कदम, रेखा कदम, सुरेखा कदम, महेश कदम, शंभू कदम, अजय चौधरी, पुजा कदम, प्रज्ञा कदम, अनुराधा कदम, सुदामा कदम, उषा कदम, सिमा कदम, हणमंत कदम आदीजण उपस्थित होते.