अणदूर : "शिक्षक हा केव्हाच सेवानिवृत्त होत नसतो तो फक्त कार्यमुक्त होतो त्यामुळे शिक्षकांनी आपली सेवा अविरतपणे चालू ठेवावि "असे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगीरथ (नाना) कुलकर्णी यांनी व्यक्त केले.तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे जेष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव चिंचोले गुरुजी यांना कै. दत्तात्रय अणदूरकर सेवानिवृत्त आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी कुलकर्णी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शरद नरवडे हे होते तर जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजुरे,हॅलो सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ शशिकांत अहंकारी,माजी ग्रामपंचायत सदस्य डॉ जितेंद्र कानडे,डॉ नागनाथ कुंभार,सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक चिंचोले,उपसरपंच बापू बोंगरगे,डॉ संतोष पवार,संतोष पाटील,संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत अणदूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना कुलकर्णी यांनी, शिक्षक हा एक समाजातील सर्वांसाठी उपयुक्त असा घटक आहे. समाजातील वाईट गोष्टी सांगणे त्या योग्य वेळी दुरुस्त करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे,हेच कर्तव्य कै.दत्तात्रय अणदूरकर यांनी केले होते आणि त्यामुळेच त्यांचा हा वसा पुढे घेऊन जाणाऱ्या सेवानिवृत्त महादेव चिंचोले गुरुजींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ शशिकांत अहंकारी यांनी सेवानिवृत्ती नंतर गुरुजनांचे कार्य चालू असल्यास समाज वाईट गोष्टी पासून दूर राहतो अशी भावना व्यक्त केली. डॉ जितेंद्र कानडे यांनी महादेव चिंचोले गुरुजी यांच्या शैक्षणिक कार्याची दखल संस्थेने घेतल्याने पुढील काळात चिंचोले गुरुजी यापेक्षाही अधिक जोमाने कार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी डॉ नागनाथ कुंभार, डॉ संतोष पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महादेव चिंचोले व त्यांच्या धर्मपत्नी यांचा सत्कार शाल श्रीफळ, पुष्पहार, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.गावातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने चार डझन वह्या मुख्याध्यापक वसंत कबाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर घोडके यांनी प्रास्ताविक दयानंद काळुंके व आभार डॉ सिद्रामप्पा खजुरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैजीनाथ चिंचोले,लक्ष्मण दुपारगुडे,सचिन गायकवाड,संजीव आलूरे, सचिन तोग्गी, मोहन चिंचोले,भास्कर व्हालदुरे,चंद्रकांत गुड्ड,सतीश राठोड, आयुब शेख यांनी परिश्रम घेतले.