तुळजापूर, दि. 19 : श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची संख्या वाढत चालली असल्यामुळे शिस्त आणि सर्व नियमांचे पालन करीत भाविकांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
भाविकांची संख्या वाढवण्यासाठी पुजारी इंद्रजीत साळुंके यांनी निवेदन दिले. मात्र अद्याप १५ हजार भाविकांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. अनेक भाविकांना दर्शन न करता परत जाण्याची नामुष्की सहन करावी लागत आहे.
मोफत मिळणारे दर्शनाचे पास केव्हा संपतील याची शाश्वती नसल्यामुळे दर्शनाला येणाऱ्या दूरच्या भाविकांची अडचण होत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या सर्व नियमांचे पालन करीत गेल्या महिनाभरापासून दर्शन व्यवस्था सुरू आहे. ही व्यवस्था विस्तारित करून भाविकांची संख्या वाढवण्याचे आव्हान प्रशासनाच्या समोर आहे. मात्र राज्य सरकारच्या सूचनांचे अवलोकन करण्याच्या कारणाने स्थानिक प्रशासनाला अडचण असल्याचे चित्र आहे.
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये गेल्या सात महिन्यांपासून दर्शन बंद होते आणि ते एक महिन्यापूर्वी सुरू झालेले तेव्हा भाविकांची संख्या चार हजार होती. टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढवण्यात येत आहे. मात्र यामध्ये प्रशासनाने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन तातडीने दर्शन संख्या वाढवण्याची गरज आहे. याअनुषंगाने तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंखे, उपाध्यक्ष विपिन शिंदे, संचालक नागेश साळुंखे, आणि पुजारी बांधवांना भाविका सोबत गाभारा मधून प्रवेश मिळावा, या मागणीसाठी नगराध्यक्ष आणि विश्वस्त सचिन रोजकरी यांनी बैठकीमध्ये मुद्दा उपस्थित केला. मात्र तो तात्काळ सोडविण्यात आला नाही त्याविषयी सकारात्मक आश्वासन देण्यात आले आहे.
कोरोना परिस्थिती मुळे खूप मोठे संकट एक आव्हान म्हणून आपल्यासमोर आलेले आहे. त्याला तोंड देण्यासाठी प्रत्येक घटकाने जबाबदारीने आणि शिस्त पाळून नियमाने वर्तन केले पाहिजे. त्यामुळे प्रशासन आणि पुजारी दोघांचेही हित सांभाळत जाणार आहे. या परिस्थितीमध्ये राज्य सरकारच्या सूचना आणि तुळजाभवानी मंदिर सर्व घटकांचे अर्थकारण याचा योग्य मेळ घालण्यासाठी भाविक पुजारी आणि प्रशासन या सर्वांनी आपापल्या ठिकाणी सर्व नियमांचे पालन करीत सर्व व्यवस्था सांभाळला पाहिजे तरच प्रत्येकाला त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याचा फायदा मिळू शकणार आहे, अशी परिस्थिती येथे दिसून येत आहे.