कोल्हापूर, दि. 14 : पहिला हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
श्रीपती खंचनाळे हे भारताचे पहिले हिंदकेसरी होते. सन 1959 साली दिल्ली झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खंचनाळे यांनी हिंदकेसरीची पहिली गदा पटकावली होती. अनेक मैदाने गाजवणारा कुस्तीपटू अशी खंचनाळे यांची ओळख होती. हिंदकेसरीपद पटकावल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी मल्लांना आस्मान दाखवले होते.
नोव्हेंबर महिन्यात श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना कोल्हापूरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज सकाळी त्यांची उपचारदम्यान प्राणज्योत मालवली.