तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असल्याने तामलवाडी ग्रामपंचायतीचा धुरळा उडणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. 

तामलवाडी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ चार महिन्यापुर्वी संपला होता. परंतु कोरोनाचे भयानक संकट आल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. दि. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असुन २३ डिसेंबर पासुन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. 

तामलवाडी ग्रामपंचायतीचीही निवडणूक  रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची राज्यात आघाडी असुन या महाविकास आघाडीचीच सत्ता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असे चित्र दिसून येत आहे. राजकीय पक्षाच्या चिन्हावर जरी ही निवडणूक नसली तरी ही  निवडणूक मोठ्या राजकीय पुढ्यार्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पार पडतच नाही.

सन १९९५ ची निवडणूक सोडली तर तामलवाडी ग्रामपंचायतीवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. परंतु आमदार राणाजगजितसिंह पाटील यानी भाजपामध्ये प्रवेश केल्याने तामलवाडीचे सरपंच, उपसरपंच, बाजार समितीचे संचालक, पं.स. सदस्य, जि. प. सदस्या तसेच राष्ट्रवादीचे काही नेते कार्यकर्ते यानीही भाजपाचा रस्ता धरला. तुळजापुर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या यादीत तामलवाडी ग्रामपंचात गणली जाते. 

एकीकडे माजी सरपंच, उपसरपंच,बाजार समितीचे संचालक, जि.प.सदस्य, पं. स. सदस्य असे दिग्गज नेते असल्याने महाविकास आघाडी यांच्याबरोबर कशी टक्कर देणार? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदरीत भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असुन महाविकास आघाडीचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाल्याचे दिसून येत असुन थोड्याच दिवसात तामलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा उडणार आहे.

 
Top