तुळजापूर : डॉ. सतीश महामुनी

अनादिकाळापासून आणि परंपरेने पुजारी व्यवसाय करणाऱ्या तुळजापुरातील शेकडो पुजारी बांधवांमध्ये आजही प्रामाणिकपणे दत्ताची सेवा केली जाते याचे मूर्तिमंत उदाहरण सोमवारी तुळजापुरात निदर्शनास आले.

तुळजापुरातील खडकाळ गल्ली येथे पुजारी व्यवसाय करणारे सोमनाथ नानासाहेब अमृतराव यांच्याकडे बीड जिल्ह्यातील गजापूर तालुका धारूर येथील महादेव उत्तम मुंडे आणि त्यांचे जावई विष्णू घुले सहकुटुंब सहपरिवार तुळजाभवानीचा कुलधर्म कुलाचार करण्यासाठी आले होते. देवीच्या पूजेसाठी आणि कुलधर्म करण्यासाठी धनधान्य आणि इतर वस्तू वाईट स्वरूपात आणले जातात तसेच या कुटुंबाने देखील तुरीची डाळ आणि इतर धान्य पुजारी सोमनाथ अमृतराव यांना परंपरागत पद्धतीने दिले.

कोरोना आपत्तीच्या परिस्थितीमध्ये पुजारी सोमनाथ नानासाहेब अमृतराव यांनी हे आलेले देवीचे शिद्याचे साहित्य दोन-चार दिवस उन्हामध्ये ठेवण्यासाठी बाहेर ठेवले होते. त्याच्यामध्ये या वस्तू सोबत अडीच तोळ्याचे नेकलेस आले होते. ती तुरीची डाळ देखील ठेवण्यात आली होती. तुळजापूर येथून कुलधर्म कुलाचार करून घरी परतलेल्या या कुटुंबाने घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या सुनेकडून डाळीमध्ये सोन्याचे नेकलेस ठेवले होते अशी विचारणा झाली. 

तेव्हा महादेव मुंडे यांनी सोमनाथ अमृतराव यांना ही हकीकत सांगितली. तेव्हा सोमनाथ यांनी घरी गेल्यानंतर सदर डाळीमध्ये सोन्याचे नेकलेस आहे का याची पडताळणी केली तेव्हा ते असल्याचे दिसून आले. तेव्हा त्यांनी सोन्याचा दागिना असल्याचे सांगितले आणि शनिवार २६ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता सदर सोन्याचे नेकलेस सोमनाथ अमृतराव यांनी भक्तांना साभार परत केले. 

काँग्रेसचे नगरसेवक सुनील रोजकरी यांनी सोमनाथ अमृतराव यांचे समक्ष भेटून अभिनंदन केले. तसेच पप्पू रोचकरी आणि पप्पू शिंदे यांनी सोमनाथ अमृतराव यांचा या प्रामाणिकपणाच्या दातृत्वा बद्दल सत्कार केला. तुळजाभवानी देवीचे पुजारी व्यवसायामध्ये अनेक वेळेला अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आले आहेत. देवीचे भक्त हे आपल्या पुजाऱ्याला सोबत घेऊन आपल्या कुटुंबाचा कुलधर्म कुलाचार पूर्ण करतात. त्यामुळे पुजारी बांधव देखील तेवढ्या जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे भावी भक्तांची सेवा आणि त्यांचा कुलधर्म कुलाचार करीत असतात. यादरम्यान अशा दिलासा देणाऱ्या घटना सातत्याने तुळजापुरात दिसून येतात.

 
Top