तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत दि. १८ रोजी होणार असून अनेकांनी सरपंच होण्यासाठी तयारी केली असली तरी आरक्षण कोणाला पडणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर तालुक्यातील जुन ते सप्टेंबर महिन्यामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत दि. १८ रोजी होणार आहे. कोविड- १९ च्या प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.वार्डनिहाय सदस्यांची आरक्षण यापुर्वी जाहीर करण्यात आले आहे. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरपंच पदाचे आरक्षण पुढे ढकलण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेकजण सरपंच होण्यासाठी तयारीला लागले असले तरी सरपंच पदाचे आरक्षण कोणाला पडणार याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत. निवडणूकांची उत्सुकता सर्वांना लागली असुन मतदार याद्यामध्ये घोळ असल्याचे बोलले जात आहे.प्रत्येक गावामध्ये वार्ड निश्चित करून वार्डनिहाय मतदार यादी बनवली जात परंतु याद्या बनवत असताना काही राजकीय पुढारी अधिकार्यांना हाताशी धरून आपल्या सोयीप्रमाणे मतदार याद्या बनवत असल्याचे दादा घोडके यांनी बोलताना सांगितले.
ज्या वार्डात वास्तव्य तिथेच मतदान अशा पध्दतीने याद्या बनवण्यात याव्यात अशी मागणी गतवर्षी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी केली होती. त्याप्रमाणे संबंधित अधिकारी यांनी जनतेला विश्वासात घेऊन याद्या बनवल्या पाहीजेत.काही ठिकाणी मतदार राहतात एका वार्डात अन् मतदार यादीत नाव असते तिसर्या वार्डात हे असे का होते? याकडेही संबंधित अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
याबाबत सुरतगाव येथील दादा घोडके यानी मतदार यादीतील घोळाबाबत तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटुन लेखी अर्ज देण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित अधिकारी यांनी तो अर्ज स्वीकारला नसल्याचे घोडके यांनी बोलताना सांगितले.असाच मतदार याद्यात घोळ राहीला तर सामान्य नागरीकांचे ग्रा.पं सदस्य होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे.परंतु हे किती दिवस चालणार? असा सवाल करत याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे असेही दादा घोडके यांनी बोलताना सांगितले आहे.