नळदुर्ग, दि. 08 : महावितरणच्या गलथान कारभारामुळे नंदगाव ता. तुळजापूर येथील झीरो लाईनमनचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संबंधित विद्युत ऑपरेटरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ओंकार श्रीकांत सुरवसे (वय वर्ष २१, रा. नंदगाव, ता. तुळजापूर) असे विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या त युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, नंदगाव येथील युवक ओंकार सुरवसे हा गावातील विद्युत पोलवर कामासाठी चढला होता. नंदगाव विभागाचे लाईनमन विद्यासागर पवार यांनी नळदुर्ग येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात फोन करुन रीतसर लाइन बंदचे परमिट घेऊन झिरो लाईनमन सुरवसे यांना नंदगाव शिवारातील बिराजदार डीपीचे काम करण्यास सांगितले होते. मात्र परमिट घेतलेली असताना सुध्दा संबंधित ऑपरेटरने लाइन चालूच ठेवली. यामुळे पोलवरील विद्युत वाहिन्यांचा स्पर्श होताच सुरवसे या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान जोपर्यंत संबंधित आॅपरेटर वर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. या घटनेचा पंचनामा करण्यात आला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.