रेडा (इंदापूर), दि. 04 : मंडल कृषी अधिकारी असल्याचे भासवून फिरायला सरकारी गाडी आहे. दिमतीला शहरात प्लॉट, जे सी बी, पोकलेन, ट्रक, लाखो रुपयांची संपत्ती असल्याचे सांगून एका मुलीचे जीवन उध्वस्त केलेल्या तोतया मंडल कृषी अधिकाऱ्याला अकलूज पोलीसांनी अटक केले आहे. 

याबाबत अकलूज पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की , महेश दिगंबर जगदाळे ( रा . घोरपडवाडी , ता . इंदापूर, जि. पुणे) याचे लवंग (ता. माळशिरस , जि. सोलापूर ) येथील एका मुलीशी दि. १४ ऑगस्ट २०२० रोजी लग्न झाले. लग्न करतेवेळी महेशने माझे शिक्षण बीएस्सी अॅग्री झाले असून मी पन्हाळा येथे मंडल कृषी अधिकारी पदावर काम करत आहे. मला शासनाने गाडी दिली आहे. माझी चार एकर जमिन असून माझ्याकडे पोकलेन, दोन ट्रक, कराड व सातारा येथे दोन प्लॅट आहेत अशी खोटी माहिती दिली. 

लग्नानंतर चारच महिन्यात त्याने मुलीला त्रास देण्यास सुरूवात केली. त्याची नोकरी खोटी आहे, तो मंडल कृषी अधिकारी नाही व त्याचे इतर अनेक मुलींशी संबंध असल्याचे समजल्यावर सदर मुलगी माहेरी लवंग येथे आली व तिने दि. १ जानेवारी रोजी नवरा महेश दिगंबर जगदाळे, सासु सासरे व लग्नात असलेला मध्यस्त यांच्या विरूध्द अकलूज पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर भादवीसंक . ४९८ ( अ ) , ४२० , ४६७ , ४६८,१७०,१७१,४६५ , ५०४ , ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर आरोपीस पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय बबन साळुखे , पोहेकॉ . विश्वास शिनगारे, पोहेकॉ. कुंभार, ज्ञानेश्वर सरडे, जमीर शेख , पोना. शिवाजी जाधव , पोकॉ . प्रविण हिंगणगावकर यांनी अटक करून माळशिरस न्यायालयात हजर केले असता दि. ५ जानेवारी पर्यंत त्यास पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

याबाबत आधिक वृत्त असे की, थोरल्या भावाच्या जावयाने सदर स्थळ त्यांच्या मुलीसाठी आणले होते. मुलाला सरकारी नोकरी, सरकारी गाडी आहे, ट्रक, पोकलॅन व प्लॅट आहेत. तुमच्या मुलीचे कल्याण होईल असे त्यांनी सांगितल्यानंतर मुलीच्या वडिलांनी व इतरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मुलीचे लग्न लावून दिले. ही माहिती खरी असल्याचे भासवण्यासाठी मुलगा महेश याने खासगी गाडीला महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावला. बीएस्सी अँग्रीचे बनावट सर्टिफिकेट दाखवले. कोणत्या तरी बनावट ऑफिसमध्ये बसल्याचे फोटो दाखवले. कोणाला संशय येऊ नये म्हणून लग्नाची बैठकही त्याने मुलीकडेच घेतली . या बैठकीला त्याने बनावट मामा उभा केला. तर लग्नाला मात्र दुसराच मामा हजर होता. 

सरकारी नोकरदार मुलगा मिळतोय. मुलीचे कल्याण होईल म्हणून मुलीच्या वडिलांनी उसणवारी करून ६ लाख रूपये खर्च करून नरसिंहपुर (ता. माळशिरस ) येथील मंगल कार्यालयात लग्न लावून दिले. या लग्नामध्ये महेशने मुलीच्या अंगावर घातलेले सोनेही नंतर बनावट असल्याचे उघड झाले. लग्नानंतर महेशने सदर मुलीला एक महिना आपल्या घरी ठेवले. तुझ्या भावाला सरकारी नोकरी लावतो. त्यासाठी तुझ्या वडीलांना पाच लाख रूपये द्यायला सांग असेही त्याने आश्वासन दिले होते. त्यानंतर तो तीला घेऊन कराड येथे गेला. कराडला स्वत:चा फ्लॅट असल्याचे सांगणाऱ्या महेशने प्रत्यक्षात मुलीला एका भाड्याच्या प्लॅटवर ठेवले. येथे त्याचे दुसऱ्याच एका मुलीबरोबर अनैतिक संबध असल्याचे दिसून आल्याने सदर मुलीने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने ही तुझ्या अगोदरची माझी बायको आहे. तुझा नंबर दुसरा असे तिला सांगितले. माझी मुलगी माहेरी आल्यानंतर त्याने घटस्फोटाची नोटीसही पाठवून दिलीय.

या तोतया अधिकाऱ्याने आम्हाला भुलथापा दिल्या आणि लग्न करून घेतले. या सगळ्या फसवणुकीच्या प्रकारामध्ये मुलाचे आईवडील व माझ्या थोरल्या भावाच्या जावायाचा समावेश असल्यामुळे आम्ही त्यांच्याविरूध्द अकलूज पोलीसांमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचे मुलीच्या वडीलांनी सांगितले.

लग्न जमवताना मुलींच्या पालकांनी स्वतः सर्व गोष्टींची खातरजमा करुन घ्यावी . कोणाच्याही सांगण्यावरुन किंवा नातेवाईकाकडुन मिळालेल्या ऐकिव माहीतीवर विश्वास न ठेवता स्वतः पाहणी करावी. कोरोनाचे कारण देत लग्न उरकरण्याचीही सध्या घाई केली जाते. त्यामुळे निरखून पारखून सतर्क राहून लग्ने जमविण्याची गरज आहे.

- भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक , अकलूज 

 
Top