तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये दि. ४ रोजी नामनिर्देशन पत्र काढुन घेण्याच्या दिवशी भाजपाच्या बाळासाहेब रणसुरे यानी नामनिर्देशन पत्र काढुन घेतल्याने महाविकास आघाडी प्रणित सर्वधर्म समभाव ग्रामविकास आघाडीचे प्रभाग क्र. २ चे उमेदवार अप्पासाहेब रणसुरे हे बिनविरोध निवडून आले असून महाविकास आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आता प्रत्यक्ष ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असुन तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असताना दि. ४ रोजी नामनिर्देशन पत्र काढुन घेण्याच्या दिवशी प्रभाग क्र. २ चे भाजपाचे उमेदवार बाळासाहेब रणसुरे यांनी आपली माघार घेतली. तसेच दुसरे अपक्ष उमेदवार राम कांबळे यानीही आपली उमेदवारी माघारी घेतल्याने महाविकास आघाडी प्रणित सर्वधर्मसमभाव ग्रामविकास आघाडीचे उमेदवार अप्पासाहेब रणसुरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. महाविकास आघाडीला पहिला विजय मिळाल्याने आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दि. ५ जानेवारी पासुन प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार असून राहिलेले दहा उमेदवारही बहुमताने निवडून आणणार असल्याचा संकल्प महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आला. महाविकास आघाडीच्या या पहिल्या विजयाने भाजपाच्या गोटात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. तसेच इतर तरूण उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज माघारी घेऊन ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

तामलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तरुणाची मोठी फळी तयार करुन तरूण उमेदवार मैदानात उतरवल्याने बदलाचे वारे वाहत असल्याचे दिसून येत असुन दि. ५ पासुन प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होणार आहेत. प्रचाराच्या या रणधुमाळीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Top