नळदुर्ग, दि. 04 : सध्या कडाक्याच्या थंडीची चाहूल लागली असून उघड्यावर झोपलेल्या बेघर लोकांना चादर पांघरून घालून मायेचा आधार देण्याचा प्रयत्न वात्सल्य सामाजिक संस्था करीत आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे नळदुर्ग येथील नगरसेवक बसवराज धरणे यांच्या घरातील लग्नसोहळ्यात धरणे कुटुंबीयांनी फेटे बांधण्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च टाळून वात्सल्य सामाजिक संस्थेच्या ‘निराधारांना मायेचा आधार’ या उपक्रमात सहभाग घेत आदर्श पायंडा पाडला आहे.
नळदुर्ग आणि परिसरात सध्या हिवाळा जाणवू लागला आहे.सात नंतर कडक थंडी ही अंगात हुडहुडी भरवत आहे,याचा विचार करून वात्सल्य सामाजिक संस्थेने निराधारांना उबदार ब्लॅंकेटचे संरक्षण देत सामाजिक संवेदना जागृत ठेवण्याचा संदेश दिला आहे.
या उपक्रमात वात्सल्य सामाजीक संस्थेचे मार्गदर्शक उमाकांत मिटकर, संजय जाधव, श्रमिक पोतदार, विशाल डुकरे, प्रवीण म्हमाने, कैलास घाटे, सुभाष कोरे, राजू महाबोले यांनी सहभाग घेतला.