नळदुर्ग, दि. १७ : राज्यासह परप्रांतातील असंख्य भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेञ मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबाची पौष पौर्णिमेला भरणारी याञा कोरोना संसर्गजन्य आजारामुळे रद्द करण्यात आली असून ठराविक मानक-यांना पौष पौर्णिमेला पारंपारिक पद्धतीने विधीवत पूजा व धार्मिक विधी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दि. २७ ते २९ जानेवारी हे तीन दिवस मैलारपूर मंदिराकडे येणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तसेच व्यवसायीकांना दुकान लावण्यास मनाई करण्यात येणार आहे.
याबाबत रविवारी दि.१७ रोजी मंदिर सभागृहात पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगर पालिका, मानकरी, पुजारी, लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.
नळदुर्ग येथील श्री खंडोबाची याञा दरवर्षी पौष पोर्णिमेस भरते. या याञेस परप्रांतासह राज्यभरातुन लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. या वर्षी २८ व २९ जानेवारी रोजी पौष पोर्णिमा आहे. या दरम्यान बुधवार २७ ते शुक्रवार २९ जानेवारी हे तीन दिवस भाविकांना प्रवेश बंद करण्यात येणार असून नळदुर्ग व अणदुरच्या प्रत्येकी पंचवीस मानक-यांना या काळात पारंपरिक विधी करण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी मैलारपूर मंदिराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. बाहेर गावच्या भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. या बैठकीस सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश राऊत,पोलिस उपनिरिक्षक सुधीर मोटे, धनंजय वाघमारे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाँ. राहुल जानराव, नगरपालिका स्वच्छता निरिक्षक खलिल शेख, तलाठी तुकाराम कदम, कमलाकर चव्हाण, याञा कमिटी अध्यक्ष सुधीर सुर्यकांत पाटील , मनोज मुळे, खंडोबा मंदिर ट्रस्टचे चेअरमन प्रकाश मोकाशे, नगरसेवक बसवराज धरणे, नितीन कासार , महालिंग स्वामी, विनायक अहंकारी , माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर , सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, नवल जाधव , शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर , शहरप्रमुख संतोष पुदाले, शाम कनकधर, वाहतुक नियंञक दिपक डुकरे , यासह नळदुर्ग, अणदुर येथिल मानकरी , प्रतिष्ठित नागरिक , आदी उपस्थित होते.