हन्नुर  : नागराज गाढवे 

अक्कलकोट तालुक्यातील पितापुर ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर वार्ड क्रमांक दोन मध्ये तीन जागांसाठी निवडणूक होणार आहे. पितापुर येथील वार्ड क्रमांक दोन मध्ये सहाशे मतदार आहेत. 

अक्कलकोट तालुक्यातील पितापुर ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी वार्ड क्रमांक एक मधून विजया सुरेश व्हनमाने, सदाशिव अण्णाराव पांढरे, कल्पना गिरीधर शिंगाडे तर वार्ड क्रमांक तीन मधून जिनत अब्दुल कादर सगरी, शाईन अब्दुल शुकुर सगरी,  गुलाब नामदेव देडे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर वार्ड क्रमांक दोन मधून जनसेवा ग्रामविकास आघाडीकडून रुकसाना फकीर, बाबुलाल चिक्कळी, अकीलाबी फकीर हे निवडणूक लढवत आहेत. तर शिलेशबाबा महाविकास आघाडीचे उमेदवार वार्ड क्रमांक दोन मधून मालनबी नदाफ, महंमद हनीप, सैपन मुल्ला खातुनबी फकीर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर  मैमुना फकीर हे अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत.

पितापुर ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक एक आणि तीन मधील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. गावातील सर्व नागरिकांनी वार्ड क्रमांक दोन मधील उमेदवार बिनविरोध करण्यासाठी अनेक बैठका घेतल्या गावातील जेष्ठ नागरिक युवकांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले. पण सरपंचपद आरक्षणावर लक्ष ठेवून अनेकांनी निवडणूक लढविण्याचे ठरविले वार्ड क्रमांक एक आणि तीन मधील बिनविरोध निवडून आलेले उमेदवार कोणाला पाठिंबा देणार हे निवडणूक निकाल नंतर ठरणार आहे.

गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत वार्ड क्रमांक एक आणि तीन मधील उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. वार्ड क्रमांक दोन मध्ये मतदान घेण्यात आले होते यावेळीही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. गावचा विकास करण्यासाठी निवडणूक देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर अपक्ष उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निवडणुकीत प्रचार सभा घेण्यासाठी बंदी घातली आहे. म्हणून दोन्ही गटातील उमेदवार मतदारांची वैयक्तिक भेटीगाठी घेऊन आश्वासने देत आहेत. पितापूर ग्रामपंचायत निवडणुक रंगतदार ठरणार असून तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.  

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र प्रचार करणारे कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. गावचा विकास, वैयक्तिक संबंध यावर निवडणूक अवलंबून आहे. स्वच्छता, पाणी पुरवठा आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवडणूक होत आहे. पितापुर ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही गटातून यावेळी युवकांना संधी देण्यात आली आहे. दोन्ही गटातील उमेदवार समाज माध्यमातून प्रचार करत आहेत.

पितापूर येथील अनेक मतदार परगावी आहेत. निवडणुकीतील उमेदवार त्यांच्या संपर्कात आहेत. पितापूर ग्रामपंचायत निवडणुक भाऊ बंदकीमध्ये होत आहे. सगे सोयरे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. या निवडणुकीत युवकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. पितापुर येथील मतदार सुज्ञ असून ग्रामपंचायत निवडणुकीत शिलेशबाबा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार का जनसेवा ग्रामविकास आघाडीला कौल देणार हे मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. सध्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला आहे.

 
Top