चिवरी : राजगुरु साखरे

उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायत निवडणुक होत असून तर यातील 40 गावातील नागरिकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायती बिनविरोध काढले आहेत. तर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असल्याने सध्या गल्लोगल्ली गावकी  भावकी मध्ये निवडणुकीचे वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवाराकडून सोशल मीडियावर इमेज डेव्हलपिंग  केली जात आहे. एरवी गल्लीबोळातून घुमणारी प्रचाराची आरोळी आणि घोषणांचा धुरळा सध्या सोशल मीडियावर उडताना दिसत आहे. 

कोरोनामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाचा कहर काहीसा कमी होताच एकाच वेळी मोठ्या संख्येने ग्रामपंचायतची निवडणूक लागली आहे. गावची सत्ता असणे हे मोठ्या प्रतिष्ठेची असल्याचे मानले जाते. त्यामुळे गावातील स्थानिक कार्यकर्त्यांसह वरिष्ठ नेत्याकडून ग्रामपंचायती आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न केले जातात. गेल्या काही वर्षांपासून देशात मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वयोगटातील लोक सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवाराकडून केला जात आहे. त्यासाठी सक्रिय कार्यकर्ते याबरोबरच वार्डातील मतदाराचे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. 

निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच गावातील विविध गटांच्या कार्यकर्त्याकडून आपल्या गटाच्या आणि नेत्याच्या समर्थनार्थ पोस्ट करण्यात येत आहेत. त्यासाठी विविध इमेज, गाणी, व्हिडीओ क्लिप्स यांचा खुबीने वापर केला जात आहे. तसेच विविध मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून आपल्या उमेदवारीची प्रतिमा आकर्षक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. उमेदवारांना चिन्हे  मिळाल्यानंतर उमेदवार त्यांची चिन्हे, त्यांनी यापूर्वी केलेली कामे आधीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना पोचविण्यात येत आहे. त्यासाठी तरुण कार्यकर्त्यांचा पुढाकार वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 
Top