नळदुर्ग, दि. 10 : पुणे येथील नातू फौंडेशनचा ‘सुलोचना नातू सेवाव्रती’पुरस्कार उमाकांत मिटकर यांना शनिवार दि.९ रोजी प्रदान करण्यात आला.या पुरस्काराची मिळालेली 25 हजार रूपये रक्कम त्यांनी वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या एकल महिलांच्या कामासाठी दिली.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.नातू फौंडेशनकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वेगळे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील अनेक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे यांच्या हस्ते सेनापती बापट रोड वरील नातू सभाग्रहात हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर नातु फौंडेशनचे विश्वस्त श्री.चंद्रशेखर यार्दी,श्री.विवेक गिरधारी,श्रीमती अभया टिळक,श्री.ऋषीकेश गोडसे उपस्थीत होते.औरंगाबाद येथील डॅा.दिवाकर कुलकर्णी यांना महादेव बळवंत नातू पुरस्काराने गौरविण्यात आले.
तुळजापूर आणि परिसरात वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 78 विधवा,परित्यक्ता,बेघर,अनाथ महिलांसाठी सेवाकार्य चालतात,या महिलांच्या स्वावलंबनासाठी सदरील पुरस्कारात मिळालेली रक्कम उमाकांत मिटकर यांनी संस्थेच्या मार्गदर्शीका अनिता जाधवर यांच्याकडे अशोकराव कुकडे यांच्या हस्ते सुपूर्त केली. समाजकार्याच्या कामातून मिळालेल्या पुरस्काराची रक्कम सामाजिक कार्यासाठीच वापरणे हा नक्कीच आदर्श उपक्रम आहे असे गौरवोद्गार डॅा.अशोकराव कुकडे यांनी काढले.
उमाकांत मिटकर यांना अठरा वर्षाच्या सामाजिक कामात 43 राज्यस्तरीय पुरस्कारासह युनिस्को या जागतीक संघटनेचा ‘एज्युकेशन इनोव्हेशन’पुरस्कारही मिळाला आहे आणि प्रत्येक पुरस्काराची रक्कम त्यांनी वेळोवेळी सामाजिक कार्यासाठी दिली आहे.नातू पुरस्काराची रक्कम एकल महिलांच्या विकासासाठी देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे.
- प्रमिला जाधव
उपाध्यक्ष, वात्सल्य सामाजिक संस्था